रायगड : रायगड जिल्ह्यातील ( Raigad district ) खालापूर तालुक्यातील ( Khalapur taluka ) प्रसिद्ध झेनिथ धबधब्यावर ( Zenith Waterfall ) एक मोठी दुर्घटना टळली. मुसळधार पावसामुळे अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने शंभरहून अधिक पर्यटक ( Tourists ) धबधब्याच्या परिसरात अडकले. मात्र, स्थानिक ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत दोरखंडाच्या सहाय्याने सर्व पर्यटकांची सुरक्षित सुटका केली. या धाडसी बचावकार्यामुळे संभाव्य मोठी जीवितहानी टळली.
पहा व्हिडीओ ……
गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस ( Heavy rainfall )सुरू आहे. पावसाळी पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या खोपोलीच्या झेनिथ धबधब्यावर मोठ्या संख्येने पर्यटक दाखल झाले होते. दुपारनंतर पावसाचा जोर अचानक वाढला आणि धबधब्याच्या पाण्याचा प्रवाह वेगाने वाढल्याने शंभरहून अधिक पर्यटक मधोमध अडकून पडले.
घटनेची माहिती मिळताच विहारी ठाकूरवाडी येथील स्थानिक तरुण आणि ग्रामस्थ तातडीने घटनास्थळी पोहोचले. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता त्यांनी दोरखंडाच्या सहाय्याने एकामागोमाग एक पर्यटकांना सुरक्षित बाहेर काढले. स्थानिकांच्या धाडस, प्रसंगावधान आणि तत्परतेमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.

















