रेल्वे, रस्ते आणि वीज व्यवस्था कोलमडली
पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar district ) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने ( Heavy rains ) जनजीवन विस्कळीत झालं आहे. रेल्वे, रस्ते आणि वीजपुरवठ्यावर मोठा परिणाम झाला असून अनेक भाग जलमय झाले आहेत. काही ठिकाणी वाहतूक बंद करण्यात आली आहे, तर रेल्वे सेवाही विस्कळीत झाली आहे.
पहा व्हिडीओ …
पालघर जिल्ह्यात रात्रीपासून पावसाची संततधार सुरू आहे. सततच्या पावसामुळे नाले-ओढे दुथडी भरून वाहत आहेत, तर अनेक सखल भाग पाण्याखाली गेले आहेत. जिल्ह्यातील अनेक रस्त्यांवर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला असून काही मार्ग पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. जिल्ह्यातल्या अनेक भागात विजेच्या खांबांवर झाडं पडल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. सफाळे-नवघर मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. सफाळे बाजारपेठ आणि फुलमार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं आहे. राजगुरू ह. म. पंडित विद्यालय आणि निखिल राजन घरत कनिष्ठ महाविद्यालया समोरील रस्त्याला नदीचं स्वरूप आलं असून नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सफाळे – टेभीखोडावे मार्गावरील मांडे इथल्या पुलावरून मोठ्या वेगाने पाणी वाहत आहे.
पावसाचा मोठा फटका पश्चिम रेल्वेला ( Western Railway ) ही बसला आहे. केळवे रोड रेल्वे स्थानकाजवळ रेल्वे रुळांवर आणि नालासोपारा स्थानकातही रुळांवर पाणी साचल्याने डहाणू- विरार – मुंबई मार्गावरील अनेक लोकल आणि एक्सप्रेस गाड्या उशिराने धावत आहेत. काही चर्चगेट लोकल रद्द करण्यात आल्याने सकाळच्या गर्दीत प्रवाशांचे मोठे हाल झाले. दरम्यान जिल्ह्यात होत असलेल्या जोरदार पावसामुळे केळवा धरणाच्या संरक्षक भागात घसरण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याविषयी जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड यांच्याशी बातचीत केली असता त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून खबरदारीचा उपाय म्हणून काही नागरिकांचं सुरक्षितस्थळी स्थलांतर केल्याची माहिती दिली आहे.
















