पालघर : दरवर्षी 25 डिसेंबर हा दिवस सुशासन दिन म्हणून साजरा केला जातो. केंद्र शासनाकडून 19 ते 24 डिसेंबर या कालावधी दरम्यान “सुशासन सप्ताह, प्रशासन गांव की ओर” साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगानं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सुशासन आठवडा निमित्तानं कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होत.
या कार्यशाळेस अतिरिक्त पोलीस अधीक्षक विनायक नराळे, निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे, प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे, पोलीस उपअधीक्षक संगिता शिंदे, तहसिलदार (महसूल) सचिन भालेराव, तहसिलदार (सामान्य) प्रमोद कदम, जिल्हा नियोजन अधिकारी प्रशांत भांबरे आदि मान्यवर उपस्थित होते.
या कार्यशाळेस मार्गदर्शन करतांना जिल्हाधिकारी बोडके म्हणाले की, शासनस्तरावर विविध नाविण्यपूर्ण योजना राबविल्या जातात. या नाविण्यपूर्ण योजना सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी असल्याने त्यांची माहिती सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचली पाहीजे. याची जाणीव सर्व शासकीय यंत्रणांना असणे गरजेचे आहे. तसचं जिल्हा प्रशासन राबवित असलेल्या विविध नाविण्यपूर्ण योजनांची नोंद शासनस्तरावर होणे गरजेचे आहे, त्यासाठी हा सुशासन आठवडा राबविण्यात येतो. सुशासन सप्ताहाचा एक भाग म्हणून प्रशासन गांव की ओर अभियान राबविण्यात येत असून ‘प्रशासन गांव की ओर’ अभियानात सर्व शासकीय विभागांनी सक्रिय सहभाग घेवून नागरिकांना पारदर्शक आणि तत्पर सेवेचे वितरण करावे, असं आवाहन यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केलं.
या सप्ताहात प्रशासनाच्या नवनवीन संकल्पना आणि उपक्रमांद्वारे नागरिकांच्या सार्वजनिक तक्रारींचं निवारण, ऑनलाईन सेवा आणि सेवा वितरण अर्जाचा निपटारा करण्यात येणार असल्याचं हि त्यांनी यावेळी सांगितलं.
या कार्यशाळेत जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय , पालघर जिल्हा परिषद, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून जिल्ह्याच्या सर्वसामान्य नागरिकांसाठी असणाऱ्या विविध संकल्पना आणि उपक्रमांचं सादरीकरण करण्यात आलं.