प्लास्टिक मुक्त गाव करण्याचा खानिवली ग्रामपंचायतीचा निर्णय
पालघर : सध्याच्या काळात प्लास्टिक हे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनाचा एक भाग बनले आहे. आपल्यापैकी अनेकजणांसाठी प्लास्टिक कंटेनर्स, बॉटल्स हे दैनंदिन जीवनाचा भाग आहे. विविध प्रकारच्या अन्नपदार्थांची साठवण करण्यासाठी, फ्रिजमध्ये वस्तू ठेवण्यासाठी, खाद्यपदार्थ एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी नेण्यासाठी आपण प्लास्टिक कंटेनर्सचा वापर करत असतो. त्याचबरोबर दररोज बरेच लोकं हे पिण्याच्या पाण्यासाठी सर्रासपणे प्लास्टिक बॉटल्सचा वापर करत असतात. इतकेच नव्हे तर बाहेरून ज्या वस्तू आपण खरेदी करत असतो त्या मोठ्या प्रमाणात प्लास्टिक मध्ये पॅक केलेल्या असतात, मग त्या खाण्याच्या वस्तू असोत किंवा वापारायोग्य वस्तू असोत. आपण आपल्या चहुकडे जिकडे जिकडे नजर फिरवाल त्या त्या ठिकाणी आपल्याला प्लास्टिक नक्कीच दिसून येईल. कारण कळत न कळत प्रत्येक जण दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर करत असतो. आणि हेच प्लास्टिक आता मानवी जीवनासाठी घातक बनले आहे.
वाढत्या प्लास्टिकमुळे जगाला प्लास्टिकच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. यामुळे संपूर्ण पर्यावरण प्रदूषित होत आहे. ज्यामुळे मानवी आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. उशिरा का होईना, पण आता जगातील अनेक देशांत प्लास्टिकचा वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विविध उपाययोजना केल्या जात आहेत. हेच जगाला भेडसावणारं संकट पाहता खानिवली ग्रामपंचायती ने आपलं गाव प्लास्टिक मुक्त व्हावं, गावातलं पर्यावरण आबाधित रहावं त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराच एक नवीन साधन उपलब्ध व्हावं या उद्देशाने गावात प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी ( Plastic Solid Waste Management ) एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. ज्यामुळे गाव प्लास्टिक मुक्त तर होतचं आहे त्यासोबतच गावातल्या महिलांना रोजगाराची एक नवी संधी देखील उपलब्ध झाली आहे.
हे आहे पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्या मधलं खानिवली गाव. ज्या गावात प्लास्टिक कचऱ्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि पर्यावरण संवर्धनासाठी ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु करण्यात आला आहे. खानिवली ग्रामपंचायती ने मुंबईच्या रोटरी क्लबच्या माध्यमातून मिळालेल्या सीएसआर निधीतून गावात पीईटी बॉटल श्रेडर ( PET bottle shredder ) मशीन आणली आहे. या मशिनीच्या माध्यमातून गावात कचरा स्वरुपात पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल्स त्याचबरोबर गावातल्या दुकानांवर पडलेल्या प्लास्टिकच्या बॉटल आदी घंटागाडीद्वारे गोळा करून त्या क्रश केल्या जातात. यासाठी गावातल्या दोन महिलांना प्रशिक्षण देण्यात आलं आहे. या दोन्ही महिला आपल्या घरातील सर्व कामं आटोपून दिवसाचे चार ते पाच तास या ठिकाणी हे काम करतात.
या बॉटल क्रशिंग मशीनची क्षमता ही एका तासाला 2 हजार बॉटल क्रश करण्याची आहे. प्रक्रियेत दरम्यान अगोदर प्लास्टिक बॉटल वर असलेले लेबल हे वेगळे केले जातात. बाटलीची झाकणे वेगळी केली जातात आणि त्यांनतर या बॉटल्स क्रशिंग मशीन मध्ये टाकल्या जातात. बॉटल क्रश होवून त्यापासून फ्लेक्स तयार होतो. ज्याला क्वालिटीनुसार बाजारात 35 रुपयांपासून ते 50 रुपयांपर्यंत बाजार भाव मिळतो. या फ्लेक्स ला रिसायकल करून त्यापासून पुन्हा नव्या बॉटल्स तयार केल्या जातात. बाजारात या फ्लेक्सची मागणी पाहता दर महिन्याला जवळपास 1 हजार किलो फ्लेक्स तयार करण्याचं ध्येय या ग्रामपंचायतीने समोर ठेवलं आहे. ज्यातून त्यांना महिन्याला 40 ते 50 हजारांचं आर्थिक उत्पन्न मिळू शकेल. त्यासाठी गावातल्या प्लास्टिक बॉटल्सच्या कचऱ्यासह कुडूस, वडवली, चिंचघर या गावातून प्लास्टिकचा कचरा जमा करणाऱ्या एका संस्थेकडून ही ग्रामपंचायत प्लास्टिक बॉटल्स घेणार असल्याचं सरपंच भरत हजारे यांनी सांगितलं. तसचं आसपासच्या गावात असलेला प्लास्टिक बॉटल्सचा कचरा देखील ग्रामपंचायत 10 रुपये किलो प्रमाणे खरेदी करणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
खानिवली गावात ग्रामपंचायतीच्या माध्यामातून सुरु केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमामुळे गावातल्या दोन महिलांना गावातच चांगला रोजगार मिळाला आहे. ज्यामुळे त्या सक्षम होवून त्यांच्या कुंटुबाला आर्थिक हातभार लागू शकेल.