शो मध्ये देश विदेशातील 150 हून अधिक कॅट सहभागी
कोल्हापूर : अलीकडे समाजात विविध जातींच्या श्वानासह मांजर पाळण्याचा शौक वाढत आहे. या देशी विदेशी मांजरांची पोझ, त्यांचं घरात वावरणं बागडणं यामुळे अशी मांजरं अनेकांच्या घरांतील सदस्य बनून गेली आहेत. अनेक कुटुंबातील सदस्य विविध जातींची कॅट म्हणजेच मांजरं खरेदी करतात.
फिलाईन क्लब ऑफ इंडियातर्फे कोल्हापुरात आंतरराष्ट्रीय कॅट शो आयोजन करण्यात आलं होतं. या कॅट शो मध्ये रशियन, अमेरिकन, थायलंड सह देश विदेशातील विविध जातींच्या दीडशे हून अधिक रंगीबेरंगी मांजरी सहभागी झाल्या होत्या. या कॅट शो मध्ये दुर्मिळ मानल्या गेलेल्या रशियन सायबेरियन आणि थायलंडच्या सियामीन कॅटचाही समावेश होता. तसचं हुबेहूब बंगाली टायगर सारख्या दिसणाऱ्या बंगाली कॅट, बंगाली मेन कून, पॅर्शियन मांजर, क्लासिक लॉंग हेअर आणि शॉर्ट हेअर, एक्झाटिक हेअर अशा विविध जातींच्या लाखो रुपये किमतीच्या मांजरी सहभागी झाल्या होत्या.
बंगाली टायगरसारखा दिसणाऱ्या बंगाली कॅटपासून पर्शियन तसंच विविध जातींच्या मांजरांना पाहण्यासाठी कोल्हापुरात भरलेल्या या कॅट शो मध्ये मांजर प्रेमींनी एकच गर्दी केली होती. महाराष्ट्रातील कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे, मुंबई, तसंच गुजरात मधील अहमदाबाद, कर्नाटकातील बेळगाव, बंगळुरू आणि हुबळी इथून आलेल्या मांजर प्रेमींनी या प्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला आहे. या प्रदर्शनात गावठी म्हणून हिणवलेल्या भारतीय मांजरांना ही सहभागी करून घेण्यात आलं होत.