पालघर : नवी दिल्लीत राष्ट्रीय युवा महोत्सवात झालेल्या लोकनृत्य स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळवत महाराष्ट्राला गौरव प्राप्त करून देणाऱ्या वसईच्या अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या संघाचं आज वसईत लेझीम आणि ढोल ताशाच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आलं. भारत सरकारच्या युवा आणि खेळ मंत्रालयातर्फे नवी दिल्ली इथं १० ते १२ जानेवारी दरम्यान ‘विकसित भारत @२०४७’ ह्या शीर्षकांतर्गत झालेल्या राष्ट्रीय युवा महोत्सवात पारंपरिक लोकनृत्य स्पर्धेत अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाच्या सांस्कृतिक विभागाच्या संघानं महाराष्ट्राचं प्रतिनिधीत्व करत ‘दिवली’ हे लोकनृत्य सादर करून राष्ट्रीय पातळीवर प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यामुळे विद्यावर्धिनी परिवाराकडून आज वसई रेल्वेस्थानकावर या लोकनृत्य संघाचं जोरदार स्वागत करण्यात आलं.
यावेळी अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या नेतृत्वाखाली वसई रेल्वे स्थानकापासून वर्तक महाविद्यालयाच्या प्रांगणापर्यंत काढलेल्या स्वागत रॅलीत अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयातले प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी तसचं विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते. लोकनृत्याचे दिग्दर्शक भूषण पाटील तसचं त्यांचे सर्व वादक सहकारी आणि लोकनृत्य संघात सहभागी विद्यार्थिनींचे यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे यांच्या हस्ते पुष्पगुच्छ आणि पदकं देऊन स्वागत करण्यात आलं.
हा केवळ वर्तक महाविद्यालयाचाच नाही तर संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव असल्याचं मत यावेळी प्राचार्य डॉ. उबाळे यांनी व्यक्त केलं. लोकनृत्याचे दिग्दर्शक भूषण पाटील यांनी ही सन्माना बद्दल तसचं या संपूर्ण प्रक्रियेत पाठीशी उभे राहिल्याबद्दल विद्यावर्धिनी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष विकास वर्तक, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरविंद उबाळे, सर्व विद्यावर्धिनी परिवाराचे मनःपूर्वक आभार मानले. या आनंद सोहळ्याचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक सांस्कृतिक विभागप्रमुख डॉ. सखाराम डाखोरे यांनी केलं. तर उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार शेळके यांनी उपस्थितांचे आभार मानले. महाविद्यालयाचे प्रबंधक दिलीप वर्तक, सांस्कृतिक विभागातील प्राध्यापक सदस्यांचा तसेच विद्यार्थी सदस्यांचा ही यावेळी सन्मान करण्यात आला.