गेल्या चार वर्षांपासून राबवत आहेत सीड बॉल चा अनोखा उपक्रम
पालघर : निसर्गाच आपल्या जीवनातलं देणं समजून आणि पर्यावरणाच महत्व समजून पालघर जिल्ह्यातल्या एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने वृक्ष लागवडीचा विडा उचलला आहे. आता जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक म्हटलं तर आपल्या नजरे समोर एक वेगळच चित्र पटकन उभं राहतं हो ना..पण या शिक्षकाच्या बाबतीत तसं नाही बरं का…या शिक्षकाने आपल्या शाळेतल्या मुलांना घेऊन काही वेगळीच शक्कल लढवली आहे. ज्यातून मोठ्या प्रमाणात गेल्या चार वर्षांपासून वृक्ष लागवड केली जात आहे..
पालघर जिल्ह्यातल्या डहाणू ( Dahanu ) तालुक्या मधल्या लिलकपाडा इथल्या जिल्हा परिषद शाळेचे ( Lilakpada Zilla Parishad School ) शिक्षक दिपक देसले यांनी मोठ्या संख्येत सीड बॉलच्या ( Seed Ball ) माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा ( Environmental Conservation ) उपक्रम खाती घेतला आहे. शिक्षक दिपक देसले यांनी आणि त्यांच्या शाळेतल्या मुलांनी आयुर्वेदात उपयोगात येणाऱ्या आणि सहजासहजी उपलब्ध होणाऱ्या बेहडा, आपटा, बहावा, चिंच, लाजरा, रिठा, बेल या सारख्या बियांचा संग्रह केला. तसचं शिवण, रक्तचंदन, ढोरगुंज, लाल गुंज, पांढरी गुंज, खैर, बांबू, चिलार, सीताफळ, काशीद, कोसुंब, कांचन, करंज, बोर, अभय, बिबवा, विलयती चिंच, कांडोळ, आकेशा, देवदार या झाडांच्या बिया इतर ठिकाणांहून आणल्या. आणि त्यानंतर आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून माती, गांडुळ खत, विविध झाडांच्या बिया हे सर्व एकत्रित करून त्यापासून हे सीड बॉल तयार केले.
यंदा या लिलकपाडा शाळेतल्या विद्यार्थ्यांनी 45 हजार सीड बॉल तयार केले आहेत. तसचं या पर्यावरणपूरक उपक्रमाला जुळत जिल्ह्यातल्या विविध भागातल्या विद्यार्थी आणि शिक्षकांनी जवळपास दीड लाख सीड बॉल तयार केले आहेत. शिक्षक दिपक देसले आणि त्यांच्या शाळेतील मुलांनी तयार केलेल्या सीड बँकेत आता 30 ते 32 प्रकारच्या झाडांच्या बिया जमा झाल्या आहेत.
यंदा हे पर्यावरण प्रेमींचं जाळं आणखीन विस्तारण्यासाठी पालघर जिल्ह्यासह धुळे, लातूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, पुणे, अहिल्यानगर, रायगड, नवी मुंबई, अमरावती, अकोला, नांदेड, चंद्रपूर, अहमदनगर या सारख्या विविध शहरांत या बिया पाठवल्या गेल्या आहेत. ज्यामध्यातून या विविध भागातले शिक्षक आणि विद्यार्थी या पर्यावरणपुरक उपक्रमात जोडले गेले. आणि त्यांनी ही आपापल्या भागात हा सीड बॉल चा उपक्रम सुरू केला आहे.
हे सीड बॉल्स जून, जुलै महिन्यात विविध ठिकाणच्या डोंगरावर आणि इतर काही ठिकाणी टाकण्यात येणार आहेत. ज्यामुळे पावसाळ्यात त्या ठिकाणी नवी झाडं तयार होतील. या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षक देसले यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केलेला हा विक्रमी उपक्रम इतर लोकांसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरू शकेल.