गावातलं 70 टक्के स्थलांतर थांबवण्यात यश
पालघर : ग्रामीण भागातल्या नागरीकांचं जीवनमान उंचावण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून विविध योजना राबवल्या जात आहेत. अशाच शासनाच्या विविध योजनांच्या लाभा मुळे पालघर जिल्ह्यातल्या अनेक गावापाड्यांचं चित्र थोड्या फार प्रमाणात का होईना बदलू लागलं आहे. ज्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागां मधल्या नागरीकांचं जीवनमान उंचावण्यास मदत होत आहे. शासनाच्या रोजगार हमी योजनेअंतर्गत ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme ) येणाऱ्या योजनांचा लाभ घेवून आज पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या अंतर्गत येणारं खोमारपाडा ( Khomarpada Villege ) हे गाव राज्यातल्या अनेक गावांसाठी मॉडेल गाव ( Model Village ) ठरलं आहे.
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड या तालुक्या मध्ये मुख्य रस्त्यापासून अगदी आत मध्ये वसलेलं खोमारपाडा हे गाव. ज्याची लोकसंख्या आजच्या घडीला साडेतीन हजाराच्या जवळपास आहे. एक वेळ अशी होती कि, या गावातले लोकं रोजगारासाठी मोठ्या प्रमाणात जिल्ह्या बाहेर स्थलांतरीत होत होती. 2013 मध्ये खोमारपाडा प्राथमिक शाळेत बाबू मोरे नावाचे एक शिक्षक रुजू झाले. काही दिवसां मध्ये त्यांच्या लक्षात आलं कि, या गावातली ९० टक्क्यांपेक्षा जास्त कुटुंबे हि रोजगारासाठी हंगामी स्थलांतर करतात. त्या दरम्यान 20 टक्के पालक हे त्यांच्या मुलांना सोबत घेवून जातात. आणि मग त्या काळात मुलं त्यांचा अभ्यास विसरून जातात. ज्यामुळे मुलांच्या शिक्षणाचं मोठ्या प्रमाणात नुकसान होतं. त्यावेळी शिक्षक मोरे यांच्या लक्षात आलं कि, स्थलांतरनाचं मुख्य कारण हे एकट पिक शेती होतं. मग त्यांनी स्थलांतर थांबवण्यासाठी पालकांना गावातच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरु केले.
या प्रयत्नांची सुरुवात त्यांनी आपल्या शाळेतल्या चिमुकल्या मुलांपासून केली. त्यांनी मुलांना शेतीचे धडे देत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाच्या माध्यमातून शाळेतचं एक परस बाग तयार केली. ज्यामध्ये त्यांनी विविध प्रकारच्या फळ, फुल आणि भाज्यांची लागवड मुलांच्या हातून करून घेतली. हे सर्व त्या मुलांचे पालक पाहत होते. हळूहळू पालकां मध्ये हे जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली. त्यानंतर शिक्षक मोरे यांनी गावातील नागरिकांना गावात विविध प्रकारची शेती करण्यासाठी प्रेरित केलं. त्यासाठी गावकऱ्यांना रोजगार हमी योजने अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरु केले.
रोजगार हमी योजने अंतर्गत येणाऱ्या विविध योजनांचा लाभ मिळवून या गावातल्या नागरिकांनी भातशेती पलीकडे जावून मोगरा शेती, फळबाग लागवड, भाजीपाला लागवड, शेळीपालन शेड, गुरांचा गोठा, कुकुटपालन शेड, शेततळे, मत्स्यपालन, वर्मी कपोष्ट खत तयार करणे यासारख्या माध्यमातून गावातच रोजगाराचं साधन उपलब्ध करून घेतलं आहे. या ठिकाणी काही NGO’s देखील गावकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी काम करत आहेत. देशी वाण, शेतीला लागणारे आवश्यक साहित्य, प्रशिक्षण, बिन व्याजी कर्ज आदीच्या माध्यामातून त्या गावातल्या नागरिकांना लखपती बनण्यासाठी मदत करत आहेत.
2019-2020 मध्ये इथल्या नागरिकांचा रोजगार हमी योजनेतील सहभाग हा अत्यल्प होता. मात्र आता 2023-2024 मध्ये रोजगार हमी योजनेत इथल्या नागरिकांचा सहभाग हा मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. या गावातील 507 हेक्टर क्षेत्र हे शेतीखाली व्याप्त आहे. या गावात जवळपास 2000 कुटुंब वास्तव्यास आहेत.
परिणामस्वरूप आज या खोमारपाडा गावातल्या 70 टक्के कुटुंबीयांचं रोजगारासाठी होणारं स्थलांतर हे थांबलं आहे. आणि रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेवून चार पाच वर्षात या गावातली अनेक कुटुंब आज लखपती झाल्याचं सांगण्यात येतं. या गावाने आता समृद्धी कडे वाटचाल सुरु केली आहे. नंदादीप समृद्ध या गावाने इतरांसाठी एक आदर्श निर्माण केल्यानं राज्यभरात खोमारपाडा प्रारूप राबविण्याचं राज्य सरकारनं ठरवलं आहे.