पालघर : माती आणि पाणी या दोन महत्त्वाच्या घटकांशी निगडीत असलेला मृद व जलसंधारण विभाग शेती आणि सिंचन या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुषंगानं केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 योजना राज्यात राबविण्यात येत आहे. त्याच धर्तीवर पालघर जिल्हयात ही योजना 15 ते 20 जानेवारी दरम्यान राबविण्यात येणार आहे. राज्यात पाणलोट संदर्भात जनजागृती करण्यासाठी जानेवारी ते मार्च अशा तीन महिन्यात पाणलोट रथयात्रा काढण्यात येणार आहे. राज्यस्तरीय पाणलोट रथयात्रेचं जिल्हास्तरीय नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली.
राज्याच्या मृद व जलसंधारण विभागाची ही विशेष मोहिम असून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना पाणलोट विकास घटक 2.0 या योजनेच्या 140 प्रकल्प क्षेत्रातल्या 30 जिल्हयांमध्ये ही रथयात्रा जाणार आहे. यात कोकण विभागातल्या ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदूर्ग या जिल्हयांचा समावेश आहे.
पालघर जिल्हयातल्या विव्हेळवेढे, ओसरवीरा, वडवली, झरी, गोरवाडी, वंकास, रायतळी, गोवणे, हनुमाननगर, बिरवाडी, झांझरोली, घाटीम, दुर्वेश, बोट, तिलगाव, झाडखैर या गावांचा या रथ यात्रेत समावेश असून हि पाणलोट रथयात्रा या गावांना मधून जाणार आहे.
पाणलोट रथयात्रेचं आयोजन व्यापक प्रमाणात करण्यात येणार असून या कार्यक्रमच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा पातळीवर जिल्हाधिकारी यांची अध्यक्ष तथा नियंत्रक आणि जिल्हा जलसंधारण अधिकारी यांची सदस्य सचिव तथा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. तालुका पातळीवर उपविभागीय अधिकारी(महसूल)यांची अध्यक्ष तथा नियंत्रक आणि उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांची सदस्य तथा समन्वय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.