बाजारात २०० ते २५० रुपये किलो भावाने विकली जाते स्ट्रॉबेरी
पालघर : कुपोषणाच्या समस्येसाठी नेहमीच चर्चेत असलेल्या पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) जव्हार-मोखाडा भागांत एकेकाळी पावसाळ्यात केवळ आणि केवळ भातशेती केली जात असे. मात्र आता पालघर जिल्ह्यातल्या जव्हार आणि मोखाडा सारख्या भागातले शेतकरी शेती क्षेत्रात नवनवीन प्रयोग करताना दिसून येत आहेत. जव्हार ( Jawhar ) आणि मोखाडा ( Mokhada ) तालुक्यातल्या काही गावांमधले शेतकरी आता भात शेती बरोबरचं स्ट्रॉबेरी या फळाची देखील यशस्वी शेती करू लागले आहेत.
बायफ या संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षण घेवून आणि विविध प्रोजेक्ट ना प्रत्यक्ष भेटी देवून पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्यां मधल्या न्याहाळे, चौक आणि मोखाडा तालुक्यां मधल्या सायदे, उधळे या चार गावांमधल्या 32 शेतकऱ्यांनी एकत्र येवून जवळपास 4 ते 5 एकर क्षेत्रावर स्ट्रॉबेरीची शेती ( Strawberry Farming ) केली आहे. त्यातल्या प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात चार ते पाच गुंठा क्षेत्रात स्ट्रॉबेरी या फळाची लागवड केली आहे. सुरुवातीला या शेतकऱ्यांनी बोरगाव, कळवण आणि नाशिक या सारख्या ठिकाणाहून लागवडीसाठी स्ट्रॉबेरीची रोपे आणली. आणि मग नोव्हेंबर महिन्यात त्यांनी आपापल्या शेतात विंटर डॉन जातीच्या स्ट्रॉबेरीची लागवड केली. फळ खराब होऊ नये म्हणून मल्चिंग पेपरचा वापर करण्यात आला. या शेतीसाठी गांडूळ खत, शेणखत, गांडूळ खताचे अर्क यासारख्या खतांचा वापर करण्यात आला असून ही शेती पूर्णपणे सेंद्रिय पद्धतीने करण्यात आली आहे. तसचं पाण्यासाठी ड्रिप पद्धतीचा वापर करण्यात आला आहे. स्ट्रॉबेरी बरोबरच या शेतकऱ्यांनी आपल्या शेतात कलिंगडची देखील लागवड केली आहे.

जव्हार, खोडाळा मधल्या ३२ शेतकऱ्यांनी केली स्ट्रॉबेरीची लागवड
साधारणतः ऑक्टोबर ते मार्च महिन्या दरम्यान या स्ट्रॉबेरी ची शेती केली जाते. या शेतकऱ्यांनी लागवड केलेली स्ट्रॉबेरी आता तयार झाली असून ती बाजारपेठेत विक्री साठी जात आहे. या शेतकऱ्यांनी तयार केलेल्या स्ट्रॉबेरीला जव्हार आणि मुंबई या ठिकाणी चांगली बाजारपेठ उपलब्ध झाली आहेत. बाजारपेठेत हि स्ट्रॉबेरी 200 ते 250 रुपये किलो प्रमाणे विकली जात आहे. ज्यातून शेतकऱ्यांना चांगला नफा मिळत आहे. दरम्यान त्यातून ते दिवसाकाठी 800 ते 1000 रूपये उत्पन्न मिळवत आहेत. या शेतीसाठी आपल्याला 18,000 इतका खर्च आल्याचं शेतकरी सांगतात. त्यामुळे या स्ट्रॉबेरीच्या शेतीतून 55 ते 60 हजार रुपये इतकं उत्पन्न मिळण्याचा अंदाज शेतकऱ्यांनी वर्तवला आहे.
बायफ हि संस्था 2023 पासून जव्हार, खोडाळा, मोरपाडा, इगतपुरी, शहादा यासारख्या भागात शेतकऱ्यांसाठी कार्य करत आहे. या भागातल्या शेतकऱ्यांना स्ट्रोबेरी लागवडीचं प्रशिक्षण देवून न केवळ हि संस्था शेतकऱ्यांना शेतीकडे वळवण्यासाठी प्रयत्न करत आहे तर त्या सोबतच शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम हि करत आहे.
भातशेती नंतर स्ट्रोबेरी, कलिंगड यासारख्या पिकांची जोड मिळू लागल्यानं या भागातले शेतकरी आता शेतीकडे वळू लागले आहेत. आणि शेतीतून चांगला आर्थिक नफा मिळवण्यासाठी प्रयत्न करू लागले आहेत.