पालघर : देशी वाणांची बियाणी टिकावीत, त्यांची देवाण-घेवाण व्हावी, बियाणांचं संवर्धन व्हाव, त्यांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या हेतूने पालघर मधल्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात येत्या 29 मार्च ला बियाणे महोत्सवाचं आयोजन केलं जाणार आहे. पालघर जिल्ह्यातले शेतकरी, बागायतदार आणि देशी बियाणे संवर्धक आपल्या जवळ असलेली वेगवेगळी देशी बियाणी या प्रदर्शनात मांडतील. दरम्यान या बियाणांच्या खरेदी विक्री साठी महाविद्यालयाकडून मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले जाणार आहेत. फुलझाडे, पालेभाज्या, फळभाज्या, फळबिया, रानभाज्या, तृणधान्ये, कंद, औषधी वनस्पती आणि इतर अन्नधान्यांचे देशी वाण आदी या महोत्सवात उपलब्ध असतील. त्याचबरोबर पालघर परिसरातले प्रयोगशील आणि यशस्वी शेतकऱ्यांची यशोगाथा विद्यार्थ्यांना आणि परिसरातील शेतकऱ्यांना माहिती व्हावी यासाठी ‘संवाद : यशस्वी बागायतदारांशी’ या मुलाखतीचं आयोजन देखील यावेळी करण्यात येणार आहे.