आदिवासी महिलांनी तयार केल्या 25 हजार बांबूच्या राख्या
पालघर : बहीण भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा दिवस म्हणजे रक्षाबंधन हा सण. या सणाला राख्यांना विशेष महत्व आहे. रक्षाबंधन सणानिमित्त महिला, मुली आपल्या भावांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या विकत घेत असतात. मात्र अशात पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या महिला पर्यावरणपूरक अशा बांबूच्या राख्यां बनवण्यावर भर देत आहेत. या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या आता भारतीय सीमेवर तैनात असलेल्या सैनिकांच्या हातावर देखील झळकणार आहेत. विशेष म्हणजे या राख्यां मधून वृक्ष लागवड देखील होऊ शकेल.
पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्या मधल्या खरपडपाडा सह टेटवाली, दातेलपाडा, घोडीचापाडा, चिंचपाडा, वाकी, जांभा, विळशेत, वाणीपाडा आणि गरदवाडी, नडगेपाडा अशा 11 गावांमधल्या जवळपास 150 महिलांनी मिळून यंदा 25 हजार बांबूंच्या राख्या तयार केल्या आहेत. यंदा या बचत गटांच्या महिलांनी चार वेगवेगळ्या डिझाईन्स च्या राख्या तयार केल्या आहेत. या राख्या तयार करण्यासाठी त्यांनी मेस जातीच्या बांबूचा वापर केला आहे. जो विक्रमगड भागात आणि आसपासच्या परिसरात सहजासहजी उपलब्ध आहे.
बाजारात बाहेरून विक्रीसाठी येत असलेल्या प्लास्टिकच्या राख्या कमी व्हाव्यात आणि पर्यावरणपूरक राख्यांकडे लोकांचा कल वाढावा या उद्देशाने या आदिवासी महिलांनी बऱ्याच वर्षांपासून बांबू पासून पर्यावरणपुरक अशा राख्या बनवण्यावर आणि त्या बाजारात विक्री करण्यावर भर दिला आहे. या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या राख्यांचं विशेषत्व म्हणजे या राख्या बांबू पासून तयार केल्या असल्यामुळे त्या पर्यावरणपूरक तर आहेतचं, पण त्याचबरोबर या राख्यांच्या माध्यमातून वृक्ष लागवड देखील होणार आहे. या राख्या बनवताना त्यामध्ये तुळशीच्या बिया देखील वापरण्यात आल्या आहेत. जेणेकरून जिथे कुठे ही राखी टाकली जाईल त्या ठिकाणी ती मातीत मिसळून त्यातून तुळशीचं रोप तयार होईल.
गेल्या काही वर्षांपासून या ग्रामीण भागातील आदिवासी महिला आपल्या हातून तयार केलेल्या पर्यावरणपूरक बांबूच्या राख्या भारतीय आर्मीच्या आणि नेव्हीच्या जवानांना बांधण्यासाठी पाठवत असतात. यंदा देखील या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या 10 हजार बांबूच्या राख्या केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून भारतीय नेव्ही आणि आर्मीच्या जवानांसाठी पाठवण्यात आल्या आहेत. त्यामुळे या रक्षाबंधनला भारतीय सैनिकांच्या हातावर पालघरच्या आदिवासी महिलांनी तयार केलेल्या सुंदर आणि पर्यावरणपूरक असलेल्या राख्या झळकणार आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्यासह मुंबई आणि इतर विविध ठिकाणी या राख्या विक्रीसाठी पाठवल्या गेल्या आहेत. या एका राखीची किंमत बाजारात 50 रुपये इतकी आहे.
सद्या पावसाळ्याचे दिवस असल्याने जिल्ह्यात भात शेतीची कामं सुरू आहेत. त्यामुळे महिला वर्ग शेतीच्या कामात गुंतलेला आहे. मग अशात महिला वर्ग आपल्या घरची, शेतीची कामं आटोपून उरलेल्या दिवसाच्या काही तासांच्या वेळेत आणि रात्री काही वेळ जागून या राख्या बनवण्याचं काम करत होत्या. ज्यातून त्यांना चांगला आर्थिक हातभार मिळत आहे. केशव सृष्टी सारख्या संस्थेने या तालुक्यातल्या महिलांना त्यांच्याच गावात रोजगाराचं साधन उपलब्ध करून दिल्यानं इथला महिला वर्ग आता सक्षम होवू लागला आहे. आता इथल्या महिलांनी केशव सृष्टी या संस्थेच्या माध्यमातून आणि नाबार्डच्या सहकार्याने बांबू उद्योग प्रोड्युसर प्रा. लि……या नावाने एक कंपनी देखील स्थापन केली आहे. त्या माध्यमातून बांबू हस्तकलेच्या विविध वस्तू तयार करून या आदिवासी महिला त्यातून चांगलं आर्थिक उत्पन्न त्या मिळवत आहेत.