महिलांच्या कष्टाला यश, दर महिन्याला सरासरी १० हजारांची कमाई
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातील महिलांनी लखपती दीदी अभियानाच्या माध्यमातून आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. स्वतःच्या मेहनतीवर आर्थिक स्वावलंबनाचा मार्ग शोधत ५८,६६२ महिलांनी लखपती होण्याचा टप्पा पार केला आहे. शेतीपूरक व्यवसाय, अन्नप्रक्रिया, दुग्धव्यवसाय, लघुउद्योग आणि सेवा क्षेत्रात महिला उद्योजकता फुलत असून त्यांची दर महिन्याची कमाई सरासरी ९ ते १० हजारांपर्यंत पोहोचली आहे.
राज्यातल्या ग्रामीण आणि आदिवासी महिलांच्या आर्थिक प्रगतीसाठी लखपती दीदी ही योजना सुरू करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने पालघर जिल्ह्यात ७३,२५५ महिलांना या अभियानात समाविष्ट करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. त्यापैकी मोखाडा, जव्हार, डहाणू, वसई, विक्रमगड, वाडा, तलासरी आणि पालघर या आठ तालुक्यांमध्ये एकूण ५८,६६२ महिला लखपती झाल्या आहेत. अशी माहिती जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालिका डॉ.रुपाली सातपुते यांनी दिली आहे.
तालुकानिहाय महिलांची प्रगती :
पालघर – उद्दिष्ट १४,०००, यशस्वी महिला १२,२११
डहाणू – उद्दिष्ट १५,२५५, यशस्वी महिला ११,५४७
तलासरी – उद्दिष्ट ८,०००, यशस्वी महिला ६,८६२
वाडा – उद्दिष्ट ८,०००, यशस्वी महिला ६,५८६
विक्रमगड – उद्दिष्ट ८,०००, यशस्वी महिला ६,५१७
जव्हार – उद्दिष्ट ८,०००, यशस्वी महिला ६,०३७
मोखाडा – उद्दिष्ट ८,०००, यशस्वी महिला ५,६६३
वसई – उद्दिष्ट ४,०००, यशस्वी महिला ३,२३९
महिला सक्षमीकरणाच्या या प्रवासात महिलांनी विविध प्रकारचे व्यवसाय उभारले आहेत. दुग्धव्यवसाय, कुक्कुटपालन, अन्नप्रक्रिया, हस्तकला, कुटीर उद्योग आणि कृषीपूरक व्यवसाय यामधून त्यांना दरवर्षी १ लाख रुपयांपेक्षा अधिक उत्पन्न मिळू लागलं आहे.
पालघर जिल्हा प्रशासन, महिला व बालविकास विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने बचत गटांना प्रोत्साहन, व्यवसाय प्रशिक्षण आणि आर्थिक मदतीचे विविध पर्याय उपलब्ध करून दिले जात आहेत.
पालघर जिल्ह्यात उर्वरित १४,५९३ महिलांना ही लखपती बनवण्यासाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. लखपती दीदीच्या माध्यमातून संकल्प दृढ असेल, तर कोणती ही गोष्ट अशक्य नाही हे या ग्रामीण भागातल्या महिलांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे.