गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत मिळालं राष्ट्रीय मानांकन
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या जामसर, साखरशेत आणि साकुर या 3 प्राथमिक आरोग्य केंद्रांना, डहाणू तालुक्या मधल्या घोलवड, तलासरी तालुक्या मधल्या आमगाव आणि विक्रमगड तालुक्या मधल्या तलवाडा अशा 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांना गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत राष्ट्रीय मानांकन मिळालं आहे.
डहाणू तालुक्या मधल्या घोलवड प्राथमिक आरोग्य केंद्राला 2017 मध्ये आणि जव्हार तालुक्या मधल्या जामसर प्राथमिक आरोग्य केंद्राला 2019 मध्ये राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त झालं होतं. आणि या आरोग्य केंद्रांनी ती गुणवत्ता कायम टिकवून पुन्हा राष्ट्रीय मानांकन मिळवलं आहे. गुणवत्ता आश्वासन कायक्रमा अंतर्गत 7 ऑगस्ट ते 22 ऑगस्ट 2024 दरम्यान राष्ट्रीय स्तरावरून मूल्यांकनासाठी उपस्थित अधिकाऱ्यांनी या 6 प्राथमिक आरोग्य केंद्रांचं मूल्यांकन केलं होत.
शासकीय आरोग्य संस्थांमध्ये गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा, कर्मचाऱ्यांचे रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांशी वर्तन, रुग्णाचे हक्क, प्राथमिक आरोग्य केंद्र इमारत आणि उपलब्ध प्रशिक्षित अधिकारी-कर्मचारी, उपलब्ध औषधे, उपकरणे आणि साधने, संक्रमण नियंत्रण पद्धती, स्वछता आणि सर्व प्रशासकीय बाबी आदी सर्व बाबतीत राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रमा अंतर्गत तपास सुचिकडून (Checklist) मूल्यांकन केलं जात.
असे होते मुल्यांकन :
जिल्ह्यातल्या उत्कृष्ट काम करणाऱ्या संस्थांची या कार्यक्रमात निवड केली जाते. सर्व प्रथम तपाससूची (Checklist) प्रमाणे संस्था स्वतःचे मूल्यांकन करून आंतरविश्लेषण करून त्रुटींची पूर्तता करते. त्रुटीं ची पूर्तता करण्यासाठी तालुका तसचं जिल्हा स्तरावरून सहकार्य केलं जात. अधिकारी कर्मचारी यांची प्रशिक्षणे आयोजित केली जातात. तसचं नियमित पर्यवेक्षीय आणि संनियंत्रण भेटी या जिल्हा स्तरीय अधिकारी आणि गुणवत्ता आश्वासन कक्षाकडून दिल्या जातात. संस्थेला जेव्हा तपास सूची अनुसार ७० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त गुण प्राप्त होतात तेव्हा जिल्हा स्तरावरून गुणवत्ता आश्वासन कक्षाकडून मूल्यांकन केलं जात. त्यात संस्था पात्र ठरल्यास जिल्हा गुणवत्ता आश्वासन कक्षाकडून राज्य गुणवत्ता आश्वासन कक्षाकडे राज्य मूल्यांकनासाठी अर्ज केला जातो. राज्य कार्यालयाकडून मूल्यांकन अधिकार्यांची नेमणूक केली जाते. आणि संस्थेचे राज्यस्तरीय मूल्यांकन केले जाते. मग त्यात संस्था पात्र ठरल्यास राष्ट्रीय पातळीवरील मूल्यांकनासाठी अर्ज केला जातो. मूल्यांकनासाठी राष्ट्रीय आरोग्य प्रणाली व संसाधन केंद्र, दिल्ली कडून इतर राज्यातील वैद्यकीय क्षेत्रातील प्रशिक्षित आणि पॅनल वरील अधिकाऱ्यांची मूल्यांकन अधिकारी म्हणून नेमणूक केली जात्ते. ही मूल्यांकन प्रक्रिया 2 दिवसांची असते. निरीक्षण, अधिकारी-कर्मचारी याची मुलाखत, नोंद वह्या आणि इतर कागदपत्रे तपासणी, रुग्ण मुलाखत आदी बाबींवरून हे मूल्यांकन केले जाते. संस्था पात्र होण्यासाठी विविध निकष ठरलेले असतात. त्या सर्व निकषात संस्था पात्र ठरल्यास राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन बहाल केले जाते. हे मानांकन 3 वर्षांसाठी वैध असते. केंद्र शासनाकडून या संस्थांना दरवर्षी 3 लक्ष रुपये एवढा निधी देण्यात येतो. यातील 25% निधी बक्षीस स्वरुपात असते. आणि 75 % निधी चा वापर गुणवत्ता पद्धती आणि प्रक्रियेची (Quality Practices and processes) जोपासना साठी केला जातो.
पालघर जिल्ह्यातल्या या 6 संस्था सन 2022 पासून या मानांकनासाठी प्रयत्नशील होत्या. त्यांच्या परिश्रमाला अखेर यश आले आहे. शासकीय आरोग्य संस्थांमध्ये स्वछता, संक्रमण नियंत्रण, जैव वैद्यकीय कचरा व्यवस्थापन च्या प्रभावी अमलबजावणी साठी कायाकल्प कार्यक्रम राबविला जातो. दर वर्षी सर्व आरोग्य संस्थांचे कायाकल्प तपास सूची नुसार मूल्यांकन करून उत्तम कामगिरी करणाऱ्या संस्थांचे बाह्यमूल्यांकन केले जाते. आणि सर्वाधिक गुण मिळवणाऱ्या संस्थांना प्रथम पुरस्कार आणि 70 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या संस्थांना उत्तेजनार्थ पुरस्कार दिले जातात.