नवी दिल्ली : महाराष्ट्राच्या दोन धाडसी आणि प्रेरणादायी मुलींचा शौर्य आणि प्रतिभेचा सन्मान राष्ट्रीय स्तरावर करण्यात आला आहे. अमरावतीच्या करीना थापाला शौर्यासाठी तर मुंबईच्या केया हटकरला तिच्या साहित्य व सामाजिक कार्यासाठी ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
राष्ट्रपती भवनात झालेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावेळी केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री अन्नपूर्णा देवी, राज्यमंत्री सावित्री ठाकूर, महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सचिव अनिल मलिक उपस्थित होते.
या पुरस्काराचे स्वरूप पदक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र असे असून यंदा 14 राज्यांमधील 10 मुली व 7 मुले अशी एकूण 17 मुले या पुरस्कारासाठी निवडण्यात आली होती. यामध्ये शौर्य, विज्ञान-तंत्रज्ञान, कला-संस्कृती, समाजसेवा, क्रीडा आणि पर्यावरण यांसारख्या विविध क्षेत्रांतील असामान्य कामगिरी करणाऱ्या मुला-मुलींचा समावेश आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या आह्वानावरून 2022 पासून 26 डिसेंबर हा दिवस ‘वीर बाल दिवस’ म्हणून साहिबजादा बाबा जोरावरसिंग आणि बाबा फतेहसिंग यांना अभिवादन आणि त्यांच्या शौर्याचे स्मरण करण्यासाठी पाळला जातो. शिख धर्मातील दहावे गुरु, गुरु गोबिंद सिंग यांचे सुपुत्र बाबा जोरावर सिंग (वय 9) आणि बाबा फतेहसिंग (वय 5) यांच्या अव्दितीय शौर्याला समर्पित या दिवसाला विशेष महत्त्व आहे. त्यांच्या बलिदानाचे स्मरण म्हणून हे पुरस्कार प्रजासत्ताक दिनाऐवजी वीर बाल दिवस म्हणजेच 26 डिसेंबर ला राष्ट्रपती भवनात समारंभपूर्वक प्रदान करण्यात येतात.
करीना थापाचे शौर्य : 70 कुटुंबांचे वाचवले प्राण
अमरावतीच्या कठोरा परिसरातील जय अंबा अपार्टमेंट मध्ये 15 मे 2024 ला लागलेल्या भीषण आगीच्या घटनेत करीना थापाने 70 कुटुंबांचे प्राण वाचवले. बी-विंगमधील एका फ्लॅटमध्ये आग लागल्याचे दिसताच, करिनाने प्रसंगावधान दाखवत कुलूप तोडून आत प्रवेश केला. सिलेंडर जवळील आग आटोक्यात आणत सिलेंडर बाहेर काढल्याने मोठा स्फोट होण्याची भीती टळली. तिच्या शौर्याची दखल घेत राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
केया हटकर : साहित्य आणि समाजकार्याची ओळख
मुंबईच्या केया हटकरने अपंगत्वावर मात करत आपली ओळख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रस्थापित केली आहे. तिच्या “Dancing on My Wheels” आणि “I M Possible!” ही दोन्ही पुस्तके जागतिक स्तरावर नावाजले गेले आहेत. 13 वर्षांच्या केयाने दोन वेळा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला असून तिचे साहित्य 26 देशांमध्ये लोकप्रिय ठरले आहे. केया 10 महिन्यांपासून स्पायनल मस्क्युलर अॅट्रॉफी (SMA) या आजाराने ग्रसित आहे. ज्यामुळे ती कायमस्वरूपी व्हील चेअरवर असते. मात्र, तिने हा आजार तिच्या यशाच्या मार्गातील अडथळा होऊ दिला नाही. ती स्वतःला “SMA-ART” म्हणवते आणि विविध व्यासपीठांवर प्रेरणादायी भाषणे देते. तिच्या साहित्य व सामाजिक कार्याची दखल घेत तिला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रपती भवनात ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कार’ ने सन्मानित करण्यात आलं आहे.