गिरनार एक आत्म अनुभूती …होती. खरं तर गिरनारला ( Girnar Hill ) जायचे असे काही नियोजनात नव्हतेच…. मनात विचार यायचा कधी कधी की गिरनारला जायला हवे पण इतकी कठीण यात्रा आपण करू शकू का ?याबाबत साशंक असल्याने कधी तो विचारच केला नाही. अचानक तीन महिन्यांपूर्वी हो नाही ,हो नाही करता .आम्हा तिघीही बहिणीचं आणि माझे पती आमचे ठरले की ,आपल्या गुरुप्रती असलेला विश्वास द्विगुणीत करण्याची ही संधी सोडायची नाही आणि गिरनार यात्रा आपण करायची. शंकर महाराजांच्या कृपेने आणि गुरु निष्ठेने गिरनार ची यात्रा हो ,नाही ;हो ,नाही करताना ,अनंत अडचणींना पार करत. 26 एप्रिल ला सुरू करून 27 एप्रिल रोजी आम्ही पार केली.ह्या यात्रेत आम्ही दोघे ही ,माझ्या दोघी ही बहिणी आणि बहिणीची मैत्रीण . सारे गुरुभक्त मिळून सोबत करत होतो .
खूप लोकांच्या अनुभूती ऐकून असं वाटायचं की, आपल्याला ही तिकडे काहीतरी दिव्य अनुभूती किंवा प्रचिती निश्चितच येईल. तर आमची यात्रेची सुरुवात 27 तारखेला सकाळी रोपवेच्या खाली अति उत्साहात सुरू झाली.सकाळी पावणे सहा लाच आम्ही रोपवे च्या खाली पोहोचलो .आम्हाला पावणे सातला मध्ये सोडण्यात आले आणि अर्धा तासातच तिकडचा रोपवे ट्रायल संपल्यानंतर सर्वांना सुचित करण्यात आले की वातावरण खराब झाल्यामुळे रोपवे सुरू होणार नाही. इतकी प्रचंड गर्मी आणि रोपवे चालला नाही तर दहा हजार पायऱ्या चढणे शक्य होईल का ह्या बाबतीत आम्ही चिंतीत झालो. हळूहळू अर्धा तासाचा एक तास झाला आमची चिंता वाढत गेली. हळूहळू रोपवे साठी रांगेत बसलेले निम्म्याहून अधिक लोक निघून गेले. आता काय करायचं कोणता निर्णय घ्यायचा ?अशी सर्वांमध्ये कुजबूज सुरू झाली. खरंतर हीच मोठी परीक्षा होती. कारण ऑनलाईन बुकिंग केलेलले असलेल्या सर्वांना तुमचे पैसे रिफंड केले जातील. रोपवे सुरू होणार नाही . एव्हाना असा मेसेजही आला.तरीही आम्ही दृढ विश्वास असल्यागत तिथून न हलता तिथेच नामस्मरण सुरू केले. आणि कष्टभंजन मारुती राया आणि गुरुमाऊली शंकर महाराज यांना अगदी सहज सांगितलं आणि कोणत्याही प्रकारचा ताण न घेता अवघ्या पुढील दहा ते पंधरा मिनिटात रोपवे सुरू झाला.
त्यावेळी खूप खूप आनंद झाला कारण गिरनारची यात्रा सुरू करतानाच आलेली ही खूप मोठी प्रचिती होती. आमची यात्रा आनंदाने व उत्साहात सुरू झाली. रोपवेच्या 5000 पायऱ्या संपल्यावर अंबा मातेचे दर्शन घेताना खूप सकारात्मक वाटत होतं .त्यानंतर थोड्या पायऱ्याखाली जाऊन ,थोड्या पायऱ्या वरती गेल्यावर गोरक्षनाथ यांचे दर्शन घेतले गोरक्षनाथ चे दर्शन घेतल्यावर तिथे येणारी थंडगार हवा ही इतक्या कडक उन्हातही शितलतेची आणि गुरुमाऊलीच्या प्रेमाची अनुभूती देत होती. तेथे थोडावेळ आम्ही विश्रांती घेतली आणि गोरक्षनाथांना न्याहाळताना तेथे असलेले शंकर महाराज आशीर्वाद देत आहेत असेच प्रतीत होत होते पाचच मिनिटात आम्ही तेथून निघालो आणि नंतर पुन्हा काही पायऱ्या खाली जायच्या होत्या खाली जाताना पुढे दत्त धुणी आली पण आधी दत्तधुनीचे दर्शन न घेता आम्ही थेट दत्त माऊलीपाशी शिखरावर जाण्याचा निर्णय घेतला आणि परतीच्या प्रवासात आम्ही दत्तधुनी चे दर्शन करणार होतो .कारण तिथे प्रसाद दिला जातो आणि प्रसाद घेतल्यानंतर चढाई करणे थोडसं कठीण झालं असतं म्हणून आम्ही हा निर्णय घेतला.
मधेच थांबत, मधेच आनंद व्यक्त करत, मध्येच आध्यात्मिक अनुभूती घेत गिरनार पर्वत चढताना प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या माणसाप्रती अतिशय आदरयुक्त भाव निर्माण होत होते. स्वतःमध्ये एक वेगळा बदल होतोय याची जाणीव होत होती. तू प्रवास करताना एक एक पाऊल उचलताना श्वास जसे जड होत होते अधून मधून तहान लागत होती त्याचवेळी जीवना विषयीच्या इच्छा आकांक्षांचे सारे व्यवहार बाजूला सारले जात होते. स्वतःची ओळख होत होती जीवनाचा मोह संपत होता . सहज मनात विचार डोकावून जात होता की अशी यात्रा करताना खूप डाऊन टू अर्थ राहावं लागणार होतं. ती जमवून आणण्यासाठी सारे अहंकार गर्भगळीत होत होते. आणि तिथेच मनुष्य जन्माचे सार अवगत होत होते.
गिरनार ची यात्रा करताना कुठेतरी तोल जातो काही ठिकाणी घसरायला होतं पण सर्व ठिकाणी सावरणारा तोच असतो. परतीच्या प्रवासात आम्ही दत्तधुनी चे दर्शन घेतले तेथे प्रसाद घेतला तेथील पवित्र जल सोबत भरून आणले. आणि परतीच्या प्रवासात निघताना काही ठिकाणी पुन्हा जिथे चढाई आली तेव्हा माथ्यावर सूर्य होता अक्षरशः गर्मीने चढाई होतच नव्हती. त्यावेळी समोरून 70 -70 वर्षाची लोक अगदी गुरुमाऊली चे नाव घेत चढाई करताना पाहून मनात पुन्हा उमेद निर्माण होत होती आणि अशा प्रकारे गोरक्षनाथापर्यंतची परतीच्या प्रवासाचे चरण पार केले आणि मग पुढचा सगळा उतार एकदम सहज शक्य झाला. अशाप्रकारे पंधरा-वीस मिनिटे चालताना ही दमून जाणारी मी गिरनार यात्रा करू शकली .हे निश्चितच श्रेय माझं नाही .तर आई-वडिलांच्या आशीर्वादाने आणि माझ्या गुरुमाऊलीच्या कृपेने हे सहज शक्य झालं.
जीवनात अनेक अडचणी अनेक चढ-उतार असतात. त्याचप्रमाणे गिरनारची यात्रा करताना आपल्याला प्रचिती येते. जणूकाही ते शिखर आपलं पूर्ण जीवनपट आपल्यासमोर मांडत राहतं आणि त्या काळ्या पत्थरावर आणि त्या अरुंद पायऱ्यांवर चढताना आपण आपलं एक एक कर्म आपल्या संचितानुसार उलगडत राहतो, उलगडत जातो अन स्वतःचा बोध घेत स्वतःला समजत.
– सौ. शितल हर्षल संखे.
















