डहाणूत आरोग्य सुविधांचे लोकार्पण
पालघर : भारताला विकसित राष्ट्र बनविण्याचे स्वप्न साकार करताना समाजातील अंतिम घटकाचा विकास करणे आणि त्या घटकाला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे आवश्यक आहे. पालघरच्या सर्वांगीण विकासाशिवाय विकसित भारताचा संकल्प पूर्ण होऊ शकत नाही, असं प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी आज डहाणू इथं केलं.
अक्षय्य तृतीया आणि भगवान श्री परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्तावर पालघर जिल्ह्यातल्या डहाणू तालुक्या मधल्या ओसरविरा इथं वनबंधू ट्रस्ट आणि भारत विकास संगम यांच्याद्वारे पालघर जिल्ह्यातल्या दुर्गम भागांमध्ये फिरते दवाखाने आणि रुग्णवाहिका सेवांच्या लोकार्पण सोहळा संपन्न झाला. या प्रसंगी ते बोलत होते.

आपल्या भाषणाची सुरुवात ‘सर्वे भवन्तु निरामय:’ या मंत्राचा उल्लेख करीत त्यांनी केली. आरोग्य सुविधा केवळ शहरांपुरत्याच मर्यादित न राहता त्या दुर्गम भागात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविणे, हा आपला मुख्य संकल्प आहे असल्याचं त्यांनी सांगितलं. पालघर जिल्ह्यासारख्या आदिवासीबहुल क्षेत्रात रोजगार, आरोग्य आणि पिण्याच्या पाण्याची समस्यांवर ठोस उपाययोजना करण्याचं त्यांनी यावेळी आश्वासन दिलं. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि पालघरमध्ये एक ‘आदर्श गाव’ संकल्पना राबविण्यासाठी लोकभवन स्तरावर नियोजन सुरू असल्याचं त्यांनी यावेळी जाहीर केलं. यासाठी लवकरच जिल्हा प्रशासन आणि संबंधित यंत्रणांची बैठक घेऊन एक सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्यात येईल, अशी महत्त्वाची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’ या भूमिकेचा संदर्भ देत, राज्यपाल म्हणाले की, विकासाच्या प्रक्रियेत ‘अंत्योदय’ म्हणजेच रांगेतील शेवटच्या माणसाला प्राधान्य देणे आमचे कर्तव्य आहे. वन बंधू ट्रस्टच्या माध्यमातून दुर्गम भागात फिरता दवाखाना, रुग्णवाहिका आणि डॉक्टर उपलब्ध करून देण्याच्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केलं. चांगले इंजिनिअर, तंत्रज्ञ किंवा सनदी लेखापाल होणे ही चांगली गोष्ट आहे. पण त्यापेक्षा समाजात चांगला नागरिक म्हणून कार्य करणे ही त्याहून मोठी गोष्ट असल्याचं सांगून पीडितांची सेवा करणे हाच खरा स्वर्ग असल्याचे राज्यपालांनी नमूद केलं. या दौऱ्याच्या निमित्ताने त्यांनी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा करून दुर्गम भागातील पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितलं. आदिवासी बांधवांच्या प्रगतीसाठी लोकभवनाचे दरवाजे सदैव उघडे राहतील आणि पालघरच्या विकासासाठी स्वतः जातीने लक्ष घालणार असल्याची ग्वाही दिली.
यावेळी भारत विकास संगमचे संरक्षक संजय पटेल, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, जिल्हाधिकारी डॉ.इंदूराणी जाखड, पालघरचे पोलीस अधीक्षक यतीश देशमुख, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे, वनबंधू ट्रस्टचे अध्यक्ष आणि विश्वस्त लाडूलाल सोनी आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

















