पालघर : पालघर जिल्ह्यातल्या वरोर गावातल्या ( Varor Village ) सर्व्हे क्र. ७५० मधील १२४ जमीन मालकांनी वाढवण बंदर प्रकल्पाच्या ( Vadhavan Port Project ) विकासासाठी आपल्या जमिनीचा ताबा देण्यास संमती दर्शवली असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
२.५ हेक्टरवर पसरलेल्या या विशिष्ट जमिनीच्या तुकड्या मध्ये ४१ उपविभाग आहेत. यामध्ये एक हिस्सा सरकारचा असून उर्वरित हिस्सा वरोर गावातल्या रहिवाशांच्या मालकीचा आहे. हे क्षेत्र केवळ नकाशावरील एक बिंदू नसून, बंदराच्या पायाभूत सुविधांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा धोरणात्मक कॉरिडॉर आहे. या विशिष्ट ब्लॉक मधील गुंतागुंतीच्या सर्व्हे वादामुळे बऱ्याच काळापासून प्रगती रखडली होती, मात्र ग्रामस्थांच्या स्वयंस्फूर्त सहकार्यामुळे आता एक मोठा तांत्रिक अडथळा दूर झाला असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गावाला भेट दिली आणि बाधित जमीन मालकांशी थेट संवाद साधला. या चर्चेदरम्यान सर्व तक्रारी आणि शंकांचे निरसन करण्यात आले. विशेषतः गोळा (ब्लॉक) सर्व्हेशी संबंधित समस्यांकडे लक्ष देण्यात आले, ज्यामुळे नुकसान भरपाई मिळण्यास विलंब होत होता.
बाधित जमीन मालकांनी नुकसान भरपाईचे विषय दिवाणी न्यायालयात नेण्याऐवजी प्रशासनाशी थेट चर्चा करून सोडवण्यास पसंती दर्शवली. विश्वास आणि सहकार्याचे दर्शन घडवत, त्यांनी सरकारने प्रस्तावित केलेल्या अटी मान्य केल्या आहेत आणि कोणतीही आगाऊ नुकसान भरपाई न मागता आपल्या जमिनीचा ताबा देण्याचे मान्य केलं असल्याचं प्रशासनाचं म्हणणं आहे.
















