16 प्रवासी गंभीर जखमी, एकाचा मृत्यू
पालघर : पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Ahmedabad National Highway ) शुक्रवारी भीषण अपघात घडला. चिंचपाडा परिसरात मिनी ट्रॅव्हलर बस ( Mini-traveler Bus ) अपघातग्रस्त होऊन १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी डहाणू तालुक्यातल्या वेदांता हॉस्पिटल ( Vedanta Hospital ) मध्ये दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात पुष्पा बेन लाड या महिलेचा मृत्यू झाला आहे.
पहा व्हिडीओ :
मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील विलीमोरा ( Vilimora, Gujarat ) येथुन एक कुटुंब आपल्या मुलीला मुंबई विमानतळावर सोडण्यासाठी मिनी ट्रॅव्हलर बसने प्रवास करत होत. दरम्यान बऱ्हाणपूर गावाच्या हद्दीत अचानक बसचा टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटलं. आणि त्याच वेळी मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर ने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की बसमधील १६ प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि बचाव पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केलं. या प्रकरणी कासा पोलीस ठाण्यात ३१ वर्षीय कंटेनर चालक तैय्यब जहीर अहमद अली याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या अपघातामुळे मुंबई-अहमदाबाद महामार्गावर काही काळ मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. पोलिसांनी मोठ्या प्रयत्नांनंतर वाहतूक पुन्हा सुरळीत केली. पालघर जिल्ह्यातील चिंचपाडा परिसरात घडलेल्या या भीषण अपघातामुळे महामार्गावरील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. सध्या सर्व जखमींवर उपचार सुरू असून, पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत.

















