पालघर मध्ये अग्निशमन दलाची तत्परता
पालघर : पालघर पूर्व परिसरातील कांचनगिरी अपार्टमेंट मध्ये लिफ्ट मध्ये अडकलेल्या एका महिलेची पालघर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाने ( Palghar Fire Brigade ) वेळेवर धाव घेत सुखरूप सुटका केली. तब्बल एका तासाहून अधिक काळ लिफ्ट मध्ये अडकल्यामुळे महिला घाबरलेल्या अवस्थेत होती. मात्र अग्निशमन दलाच्या जवानांच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला.
आज सकाळी पालघर नगरपरिषदेच्या ( Palghar Municipal Council ) अग्निशमन विभाग प्रमुख सुप्रिया गुरव यांना फोनद्वारे माहिती मिळाली की, पालघर पूर्व येथील वेउर परिसरातील कांचनगिरी अपार्टमेंटच्या बी विंगमधील लिफ्टमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने एक महिला अडकली आहे. माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान रेस्क्यू वाहनासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. तेथे पोहोचल्यानंतर ४५ वर्षीय किरण सिंह हि महिला तब्बल एका तासाहून अधिक काळ लिफ्ट मध्ये अडकून असल्याचं समोर आलं.
पहा व्हिडीओ :
बंदिस्त जागेत अडकल्यामुळे त्यांना गुदमरल्या सारखे होत होते आणि त्या अत्यंत घाबरलेल्या अवस्थेत होत्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी त्यांना धीर देत विशेष रेस्क्यू साहित्याच्या सहाय्याने लिफ्टचा दरवाजा उघडला आणि त्यांची सुखरूप सुटका केली. या यशस्वी बचाव मोहिमेत लिडिंग फायरमन रुचित दवणे, यंत्रचालक निलेश पाटील तसेच फायरमन प्रतीक पाटील, रुपेश पामाळे आणि मोहनिष पागधरे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. महिलेने तसचं इमारतीतील रहिवाशांनी अग्निशमन दलाच्या तत्पर आणि धाडसी कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त करत जवानांचे कौतुक केलं.

















