पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar district ) होत असलेल्या मुसळधार पावसादरम्यान ( Heavy Rainfall ) मानवतेचं आणि धाडसाचं हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे. केळवे रोड ( Kelwe Road ) येथील हनुमानपाडा ( Hanumanpada ) परिसरात पुराच्या पाण्यात अडकलेल्या एका गरोदर महिलेची ( Pregnant Woman ) घराचा दरवाजाचा स्ट्रेचर म्हणून वापर करत सुटका करण्यात आली. आशा सेविका, समाजसेवक आणि स्थानिक नागरिकांच्या धाडसी प्रयत्नांमुळे या महिलेची वेळेत रुग्णालयात नेऊन सुरक्षित प्रसूती करण्यात आली. विशेष म्हणजे या मातेनं गोंडस मुलाला जन्म दिला असून माता आणि बाळ दोघांची ही प्रकृती उत्तम आहे.
पहा व्हिडीओ :
केळवे रोड येथील हनुमानपाडा परिसरातील प्रियांका रवी यादव यांना अचानक प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्या. मात्र, परिसरात छातीभर पाणी साचल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन त्यांच्या घरापर्यंत पोहोचू शकत नव्हते. अशा गंभीर परिस्थितीत आशा सेविका दिव्या घरत, समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रसंगावधान राखत एका घराचा दरवाजा काढून त्याचं तात्पुरतं स्ट्रेचर तयार केलं. त्यावर प्रियांका यांना झोपवून पथकाने छातीभर पाण्यातून जीवाची पर्वा न करता त्यांना सुरक्षित बाहेर काढलं.
त्यानंतर प्रियांका यादव यांना तातडीने सफाळे ग्रामीण रुग्णालयात ( Saphale Rural Hospital ) दाखल करण्यात आलं. डॉक्टरांनी तत्काळ उपचार सुरू करत सुरक्षित प्रसूती केली आणि प्रियांका यांनी गोंडस मुलाला जन्म दिला. सध्या माता आणि नवजात बाळ दोघांचीही प्रकृती स्थिर असून या धाडसी बचाव मोहिमेबद्दल आशा सेविका दिव्या घरत, समाजसेवक चेतन गावड आणि त्यांच्या संपूर्ण टीमवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पुराच्या संकटातही माणुसकीचा हात पुढे करणाऱ्या या देवदूतांनी दोन जीव वाचवून समाजासमोर प्रेरणादायी उदाहरण उभं केलं आहे.
















