पालघर : पालघर जिल्ह्यातून एक लव जिहादचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सोशल मीडियावरून ओळख करून घेत, खोटी ओळख वापरून एका तरुणीची फसवणूक केल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. पीडितेच्या तक्रारीवरून या प्रकरणी केलवे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
पालघरमध्ये एका तरुणीसोबत कथित फसवणूक करून ओळख लपवत अगोदर प्रेम आणि संबंध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. बजरंग दलाच्या हस्तक्षेपानंतर पीडितेच्या तक्रारीवर केळवे पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली असून पुढील तपास सुरू केला आहे. या प्रकरणाबाबत बजरंग दलाचे मुकेश दुबे यांनी सांगितले की, पीडित तरुणीने न्यायासाठी बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेकडे धाव घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला आणि प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं.
पहा व्हिडीओ ……
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेची आरोपीशी ओळख इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर झाली होती. आरोपीने “अजय मस्के” या नावाने बनावट अकाउंट तयार करून आपली ओळख लपवली होती. दोघांमध्ये संवाद वाढत गेल्याने नातं प्रेमसंबंधात बदललं. तरुणीचा दावा आहे की आरोपीने स्वतःला हिंदू असल्याचं सांगून तिला केळवे येथील एका मंदिरात नेऊन तिच्याशी लग्न केलं. जवळपास पाच महिन्यांनंतर आरोपी आणि त्याची पहिली पत्नी यांनी पीडितेकडे लाखो रुपयांची मागणी केली. पैसे न दिल्यास फोटो आणि व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी दिली. यादरम्यान आरोपीने यापूर्वीही तिच्याकडून मोठी रक्कम घेतली होती. या वादातून दोघांमध्ये तणाव निर्माण झाला. पीडितेचा आरोप आहे की, याच काळात तिला समजले की आरोपी मुस्लिम समाजाचा असून तो आधीच विवाहित होता आणि त्याने आपली ओळख लपवून तिची फसवणूक केली होती.
बजरंग दलाच्या म्हणण्यानुसार, आरोपीने अशाच प्रकारे इतर मुलींना ही फसवल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, पोलिसांनी तपास सुरू असल्याचं सांगितलं असून अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, संबंधित तरुणी आधीच विवाहित असून एका मुलाची आई आहे. या प्रकरणात आरोपीला पुण्यातून अटक करण्यात आली आहे.
















