पालघर : पालघर जिल्ह्यात ( Palghar District ) एक भीषण हिट अँड रन अपघाताची ( Hit and Run Accident ) घटना समोर आली आहे. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. मृत व्यक्तीची ओळख तमसाई येथील ३५ वर्षीय किशोर शुक्रा जाधव म्हणून करण्यात आहे. तर जखमींमध्ये तमसाई येथील नाना रामू गावित आणि विरार येथील अंकुश काशीनाथ माळी यांचा समावेश आहे.
पहा व्हिडीओ :
मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी उशिरा रात्री विरारहून पालघर रेल्वे स्थानकावर आलेल्या आपल्या नातेवाईकाला घेऊन तिघेजण दुचाकीवरून ट्रिपल सीटने आपल्या गावी जात होते. यावेळी पालघर – मनोर मार्गावरील शेलवली येथील केएलटी कंपनीजवळ अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली आणि चालक घटनास्थळावरून फरार झाला.अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तत्काळ तिघांना ही पालघर जिल्हा शासकीय रुग्णालयात ( Palghar District Government Hospital ) दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी किशोर जाधव यांना मृत घोषित केलं. तर दोन्ही गंभीर जखमींवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी सिल्वासा येथे रेफर करण्यात आलं आहे.
दरम्यान, या प्रकरणी पालघर पोलिसांनी ( Palghar Police ) अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून फरार चालकाचा शोध सुरू आहे.

















