पालघर : पालघर जिल्ह्यातून ( Palghar District ) एक अतिशय धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. राज्यात महिला अत्याचाराच्या- घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असताना, आता एका तेरा वर्षीय अल्पवयीन चिमुकलीवर अघोरी पूजेच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार झाल्याची गंभीर घटना उघडकीस आली आहे. ही घटना पालघरच्या कासा पोलीस ठाण्याच्या ( Kasa Police Station ) हद्दीत घडली असून, एका 55 वर्षीय भोंदूने अंधश्रद्धेचा गैरफायदा घेत हा घृणास्पद प्रकार केल्याचं समोर आलं आहे.
पहा व्हिडिओ :
पीडित चिमुकलीच्या मोठ्या बहिणीला मासिक पाळीदरम्यान रक्तस्त्राव थांबत नसल्याने, ‘अघोरी पूजा’ करून औषध देतो, असा बहाणा करत आरोपीने कुटुंबाचा विश्वास संपादन केला. आणि याच बहाण्याने रविवारी रात्री रात्री बारा वाजण्याच्या सुमारास स्मशानभूमी जवळ नेत त्या निरागस चिमुकलीवर अत्याचार करण्यात आला. या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. दरम्यान, कासा पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या दोन तासांच्या आत आरोपीला ताब्यात घेतलं आहे. त्याच्यावर पोक्सो कायद्यांसह विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित चिमुकलीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अंधश्रद्धा आणि भोंदूगिरीच्या नावाखाली घडणाऱ्या अशा घटनांवर आळा घालण्यासाठी समाजानेही सजग राहणं अत्यंत गरजेचं आहे…
















