पालघर LCB आणि तारापूर पोलिसांची संयुक्त कारवाई
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) तारापूर ( Tarapur ) परिसरात घडलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्याचा ( Robbery Case ) अवघ्या २४ तासांत छडा लावत पालघर पोलिसांनी दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून जवळपास दीड लाखांच्या किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र आणि गुन्ह्यात वापरलेली दुचाकी जप्त करण्यात आली आहे.
२५ मे ला सायंकाळी साडेसात वाजताच्या दरम्यान दर्शना म्हात्रे या महिला भाजीपाला विक्री करून कुडण नवपाडा बस स्टॉपवर उतरल्या होत्या. त्या रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या गळ्यातील २० ग्रॅम वजनाचे १ लाख २० हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसूत्र ( Gold Mangalsutra ) हिसकावून पळ काढला होता.
या प्रकरणी तारापूर पोलीस ठाण्यात ( Tarapur Police Station ) भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली तारापूर पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे ( Local Crime Branch ) विशेष पथक तयार करण्यात आले.
तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी अवघ्या २४ तासांत आरोपींचा शोध घेत दर्शन जगदीश मोरे आणि प्रणेश सुरेंद्र पाटील या दोघांना ताब्यात घेतले. दोन्ही आरोपी हे पालघर तालुक्यातील घिवली परिसरातील रहिवासी असल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी आरोपींकडून चोरीस गेलेले २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली एमएच ४८ सीडब्ल्यू ०५१५ क्रमांकाची दुचाकी जप्त केली आहे.
दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना ३० मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अशोक बनसोडे करीत आहेत.

















