पालघर : वाढवण बंदर प्रकल्पासाठी ( Wadhwan Port Project ) संपादित करण्यात आलेल्या जमिनीच्या मोबदल्याच्या रकमेत ( Compensation Scam ) मोठा गैरव्यवहार झाल्याची धक्कादायक घटना पालघर जिल्ह्यात उघडकीस आली आहे. निरक्षर शेतकऱ्याची फसवणूक करून तब्बल ५० लाखांहून अधिक रक्कम परस्पर काढल्या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात ( Boisar Police Station ) तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
डहाणू तालुक्यातील ( Dahanu Taluka ) तवा मोहंडकर पाडा ( Tava Mohandkar Pada ) येथील रहिवासी किरण पांडु पालवा यांच्या मालकीची सर्व्हे क्रमांक १७३ ही शेतजमीन ग्रीनफिल्ड महामार्ग ( Greenfield Highway project ) अर्थात वाढवण बंदर प्रकल्पासाठी संपादित करण्यात आली होती. या जमिनीचा जवळपास दोन कोटी एक्याण्णव लाख रुपयांचा मोबदला बँक ऑफ महाराष्ट्र, कासा शाखेतील खात्यात जमा होणार होता.
याच दरम्यान आरोपी सुरज गिंभल, धर्मा वळवी आणि प्रसाद उर्फ मॉन्टी पाटील यांनी फिर्यादीच्या निरक्षरतेचा आणि अज्ञानाचा गैरफायदा घेत “शासनाकडून मिळणारा मोबदला लवकर मिळवून देतो” असे आमिष दाखवले.
दिनांक २१ एप्रिल ते २७ मे २०२६ या कालावधीत आरोपींनी फिर्यादीला बोईसर येथील ओस्तवाल एम्पायरमधील कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत नेले. तेथे विविध बँक कागदपत्रांवर तसेच डिजिटल मशीनवर फिर्यादीची सही आणि अंगठ्याचे ठसे घेतले गेले.
त्यानंतर आरोपींनी फिर्यादीच्या खात्याशी स्वतःचे मोबाईल क्रमांक आणि ई-मेल आयडी लिंक करून बनावट दस्तऐवजांच्या माध्यमातून खात्यातून तब्बल ५० लाख २७ हजार ७६० रुपये परस्पर काढून घेतल्याचा आरोप आहे.
या प्रकरणी बोईसर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि नितीन नरळे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत.
दरम्यान, पालघर पोलीस दलाने नागरिकांना आवाहन केले आहे की, जमीन संपादन मोबदला किंवा कोणत्याही शासकीय कामासाठी अनोळखी व्यक्तींवर विश्वास ठेवू नये. तसेच बँक खात्याशी संबंधित कागदपत्रे, अंगठ्याचे ठसे, ओटीपी किंवा वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. संशयास्पद प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.
















