गावातले शेतकरी वर्षाकाठी घेतात 6 ते 7 लाखांपेक्षा जास्तचं उत्पन्न
पालघर : काही गावं नकाशावर ठिपक्यासारखी दिसतात. पण त्यांच्या कर्तृत्वाची उंची मात्र डोंगरासारखी असते. अशाच काही गावांपैकी असलेलं एक गाव आणि ते म्हणजे खोरीपाडा ( Khoripada ). पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar District ) विक्रमगड तालुक्या ( Vikramgad Taluka ) मधल्या करसूड गावात ( Karsud village ) डोंगराच्या कुशीत वसलेला एक छोटासा खोरीपाडा. ज्या पाड्यात जवळपास ४३ कुटुंब राहतात. कधीकाळी हा पाडा केवळ एक आदिवासी पाडा म्हणून ओळखला जायचा. पावसाळ्यात भातशेती, आणि भातशेती झाल्यानंतर मात्र कामासाठी इतरत्र स्थलांतर ( Migration ) करणे या यांचा नियम. खरं तर मर्यादित साधनं, अनिश्चित रोजगार, आणि जगण्यासाठी दरवर्षी करावं लागणारं स्थलांतर हीच इथली वास्तविकता. भविष्य धूसर होतं, आणि आशा फारशा उरल्या नव्हत्या. पण बदलाचे वारे इथे हळूहळू वाहू लागले.
पहा व्हिडीओ :
या पाड्यातल्या नागरिकांसाठी पुढाकार घेतला तो महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने ( Agriculture Department of the Government of Maharashtra ). मग आणि इथल्या शेतकऱ्यांना आधार मिळाला मार्गदर्शन, नियोजन आणि महात्मा गांधी रोजगार हमी योजनेचा ( Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme ). इथल्या कष्टाळू आदिवासी शेतकऱ्यांनी या संधीवर विश्वास ठेवला. आणि आपल्या शेतीत मोगऱ्याच्या लागवडीने ( Cultivation of Mogra ) एक नवी सुरुवात केली. सुरुवातीला काही शेतकरी पुढे आले. मग हळूहळू संपूर्ण पाडाच या बदलाचा भाग बनला. आणि मग इथे घडून आली हरितक्रांती.

आज खोरीपाड्यात पहाट फुटते ती मोगऱ्याच्या सुगंधाने. दवबिंदूंनी न्हालेल्या कळ्या उमलतात. आणि त्या प्रत्येक कळीमध्ये दडलेली असते आशेची नवी कहाणी. जिथे एकेकाळी ओसाडपणा होता, तिथे आता शुभ्र मोगऱ्याची चादर पसरलेली दिसते. खोरीपाड्याचं वैशिष्ट्य म्हणजे इथली जिद्द. मोगऱ्याची लागवड फक्त शेतांपुरती मर्यादित राहिली नाही. तर गावाच्या चहुकडे असलेल्या डोंगरावर ही आज पांढऱ्या फुलांचा बहर पहायला मिळतो. डोंगराच्या उतारावर शेती करणं हे काही सोपं नव्हतं. पण निसर्गाशी दोन हात करत इथल्या शेतकऱ्यांनी ही अशक्य वाटणारी गोष्ट शक्य करून दाखवली.
इथल्या प्रत्येक शेतकऱ्याची दिनचर्या सुरू होते ती सकाळी जवळपास ३ वाजताच्या दरम्यान. सर्व शेतकरी आपल्या शेतात भल्या पहाटेच मोगऱ्याच्या कळ्या खुडतात. आणि मग ८.३० वाजेपर्यंत गावातल्या ठरलेल्या जागी सर्व जण आपापल्या शेतातील मोगरा घेऊन इथे बाजारपेठेत पाठवण्यासाठी जमा होतात. इथे प्रत्येकाच्या दर दिवसाच्या मोगऱ्याचं वजन करून नोंद केली जाते. आणि मग इथे त्या मोगऱ्याच्या कळ्यांना स्वच्छ करून मुंबईतील दादर मार्केट मध्ये विक्रीसाठी पाठवलं जातं. जिथे थेट व्यापारी बाजार भावाप्रमाणे हा मोगरा खरेदी करतात.
इथली शेतं केवळ सुंदर नाहीत. तर ते शिस्त, स्वच्छता आणि मेहनतीचं प्रतीक आहेत. कीड-रोगांवर वेळेवर उपाय, झाडांची काळजी आणि सातत्यपूर्ण मेहनत या सगळ्यांचा परिणाम म्हणजे दर्जेदार उत्पादन. आणि त्यामुळेचं या गावातले शेतकरी या मोगरा शेतीच्या माध्यमातून आता वर्षाकाठी 6 ते 7 लाखांपर्यंत उत्पन्न मिळवू लागले आहेत.
आज या नाजूक मोगऱ्याच्या फुलांनी खोरीपाड्याची अर्थव्यवस्था बदलून टाकली आहे. प्रत्येक घराच्या अंगणात फुलं आहेत. आणि त्या फुलांसोबत आली आहे समृद्धी. जिथे एकेकाळी गरिबी होती, तिथे आता आत्मविश्वास आणि स्थैर्य आहे. ही फक्त शेती नाही, तर ही एक ‘सायलेंट रिव्होल्युशन’ आहे. खोरीपाड्याची ही मौन क्रांती सांगते की, योग्य मार्गदर्शन, सरकारी योजनांचा प्रभावी वापर आणि शेतकऱ्यांची जिद्द असेल, तर कोणतंही दुर्गम गाव स्वतःचं नंदनवन तयार करू शकतं. आज खोरीपाडा केवळ एक गाव नाही, तर तो एक आदर्श आहे, एक प्रेरणा आहे. आणि मोगऱ्याच्या सुगंधात उमललेली एक प्रेरणादायी यशोगाथा आहे.

















