मुंबई, दि. 20 : बोईसर, तारापूर औद्योगिक क्षेत्रांतील प्रदुषण आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी यंत्रणांनी समन्वयातून प्रभावी कामगीरी करावी. येत्या महिन्याभरात प्रदूषणपातळीत कमालीची घट आणण्याकरीता प्रयत्न करावेत, असे निर्देष पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे दिले.
पालघर जिल्हा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या बोईसर, वसई, तारापूर या औद्योगिक क्षेत्रात येणाऱ्या विविध अडचणी, प्रदूषण, अपघात, सांडपाणी प्रक्रीया केंद्र या संदर्भात आढावा घेण्यासाठी पालकमंत्री श्री. भुसे यांनी मंत्रालयात बैठक घेतली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी पालघरचे जिल्हाधिकारी माणिक गुरसळ, कामगार उपायुक्त औद्योगिक सुरक्षा मंडळाचे अधिकारी, पालघरचे उपविभागीय अधिकारी डी.एस.नेरकर आदींसह महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी आदी उपस्थित होते.
श्री. भुसे यावेळी म्हणाले, कोरोना आणि लॉकडाऊनमुळे रोजगाराला प्राधान्य देण्यात आले. त्यामुळे या औद्योगिक वसाहतींमध्ये कामगारांच्या सुरक्षिततेबरोबर निर्माण होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण मिळविण्यासाठी जोरदार प्रयत्न करणे आवश्यक आहे. यंत्रणांनी समन्वयातून ही कामगीरी करताना ते प्रत्यक्षात दिसले पाहिजे. यापूर्वी या औद्योगिक वसाहतीमध्ये झालेल्या दुर्घटनांना जे विभाग जबाबदार असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडणार नाही यासाठी गांभीर्याने काम करा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जे कारखाने प्रदुषण नियंत्रणाचे निकष पाळणार नाही त्याच्यावर कारवाई करा. पुढील महिन्यापर्यंत या संदर्भात प्रभावी कारवाई करतांनाच या औद्योगिक वसाहतीमध्ये प्रदुषण कमी होण्याकरीता वृक्षारोपणानी मोहिम हाती घेण्याची सूचना देखील श्री. भुसे यांनी यावेळी केली .