जिल्ह्यात 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन
पालघर : पालघर जिल्ह्यात आज पासून विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करून राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा करण्यात येत आहे. जिल्ह्यात 26 ते 29 ऑगस्ट दरम्यान विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येणार आहे. ज्याचं उद्घाटन आज पालघरचे जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या हस्ते पालघरच्या क्रीडा संकुलात संपन्न झालं.
हॉकीचे महान खेळाडू ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो. याच राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या निमित्तानं 26 ऑगस्ट पासून चार दिवस जिल्ह्यात विविध क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात येत आहे. पालघर जिल्ह्यातल्या ग्रामीण भागातल्या खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ मिळावं, त्यांच्या कला गुणांना वाव मिळावा यासाठी जिल्हा क्रीडा विभागाकडून अशा विविध स्पर्धांचं आयोजन केलं जात.
यावेळी जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांनी फ्लॅग दाखवून 3 किमी रन ला सुरुवात केली. या रन मध्ये मुला आणि मुलींच्या गटात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळवणाऱ्या स्पर्धकांना आमदार श्रीनिवास वनगा यांच्या हस्ते रोख रक्कम, ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आलं. दरम्यान या चार दिवसांमध्ये विविध क्रीडा स्पर्धा होणार आहेत. या स्पर्धा मध्ये जिल्ह्यातल्या सर्वच भागातून विद्यार्थी सहभागी होत आहेत.