पालघर : मुंबईला लागून असलेले पालघर जिल्ह्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ ( Tourist Place ) केळवे ( Kelve ) पुन्हा एकदा गोळीबाराच्या घटनेमुळे ( Firing Incident ) चर्चेत आले आहे. या घटनेत एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला गोळी लागली असून तिला उपचारासाठी बोईसरच्या अधिकारी लाईफ लाईन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जिथे तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. आणि तिला निरीक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर पोलिसांनी एका १८ वर्षीय तरुणाला बेकायदेशीर गावठी कट्टयासह ताब्यात घेतले आहे.
पालघरचे पोलिस अधीक्षक यतिश देशमुख यांनी माहिती देताना सांगितले की, हे जोडपे शुक्रवारी केळवे येथील राऊत रेसिडेन्सी होम स्टे रिसॉर्टमध्ये आले होते. तरुण वॉशरूम मध्ये गेला असताना मुलीला त्याच्या बॅगेत हे बेकायदेशीर पिस्तूल दिसले. त्यादरम्यान त्या तरुणीने ते पिस्तून बघण्यासाठी घेतले असताना अचानक तरुणीच्या हाताने त्या बंदुकीचे ट्रिगर दाबले गेले आणि गोळी तिच्या मानेला लागली. असा जबाब जखमी अवस्थेत असलेल्या तरुणीने पोलिसांना दिला असल्याचं त्यांनी सांगितलं. गोळी मुलीच्या मानेला लागून मणक्यात अडकली होती. त्यानंतर तिच्यावर बोईसर मधल्या अधिकारी लाईफ लाईन हॉस्पिटल मध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली. आणि सध्या तरुणीला अंडर ऑब्सरवेशन मध्ये ठेवण्यात आले आहे. गोळी ज्या पद्धतीने लागली ते पाहून पोलिस ही घटना एक्सिडनेटल असल्याचे म्हणत आहेत. सध्या पालघर पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
चार दिवसांपूर्वीच केळवे येथील एका रिसॉर्टमध्ये एका महिलेच्या संशयास्पद मृत्यू झाल्याने हे पर्यटन स्थळ चर्चेत आलं होतं. आणि हे प्रकरण अद्याप शांतही झाले नव्हते तेवढ्यात येथे आणखी ही एक फायरिंगची घटना घडली.