प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियान अंतर्गत धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पालघर जिल्हयात शुभारंभ
पालघर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते आज पालघर जिल्ह्यातल्या मनोर मध्ये प्रधानमंत्री धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत ( Pradhan Mantri Dharti Aaba Janjatiya Gram Utkarsh Abhiyan ) धरती आबा लोकसहभाग मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला. आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवून आणण्यासाठी सुरू केलेल्या धरती आबा योजनेचा शुभारंभ आज पालघर जिल्ह्यातून होत असून ८० हजार कोटी रुपये या योजनेसाठी प्रधानमंत्री मोदी यांनी उपलब्ध करून दिले असल्याचं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
आदिवासींच्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी हे धरती आबा अभियान एक चांगली संधी असून पालघर जिल्ह्यातल्या ६५४ गावांमध्ये ते राबवलं जाणार आहे. शासनाच्या १७ विविध विभागांच्या २५ योजना यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी ५० टक्क्यांपेक्षा पेक्षा जास्त आदिवासी लोकवस्ती आहे तिथे ही योजना राबवली जाणार आहे. असं यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. धरती आबा अभियानामुळे पालघर जिल्ह्यात आणि महाराष्ट्रातल्या अनेक गावांमध्ये परिवर्तन घडवून येईल असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला . ट्रॉमा सेंटरचं निधी अभावी रखडलं काम पूर्ण करून देण्यासाठी आपण निधी उपलब्ध करून देणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी उपस्थित जनतेला दिलं. तसचं १५ ऑगस्ट पर्यंत वनपट्टे निकाली काढा असे आदेश यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले.
यावेळी आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वसई विरार शहर महापालिका अंतर्गत सर डी एम पेटिट रुग्णालयाच्या विस्तारित नव्या इमारतीचा उद्घाटन सोहळा, मीरा भाईंदर, वसई विरार अंतर्गत नव्या पोलिस आयुक्तालयाचा उद्घाटन सोहळा, मोखाडा आदिवासी विकास विभागा अंतर्गत येणाऱ्या वाड्या मधल्या गुहिर शासकीय माध्यमिक शाळेच्या नवीन इमारतीचा उद्घाटन सोहळा, प्रधानमंत्री जनमन अंतर्गत जव्हार मधल्या रायतळे आणि आपटाळे बहुउद्देशीय केंद्राचा उद्घाटन सोहळा आभासी पद्धतीने पार पडला.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि वाढवण पोर्ट प्रा. लि. यांच्या दरम्यान सामंजस्य करार, जिल्ह्यातल्या सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) मधील प्रशिक्षणार्थीना आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) संबंधित प्रशिक्षण देण्यासाठी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि कॉनफेडरेशन ऑफ इंडिया इंडस्ट्रीज (CII), यांच्या दरम्यान सामंजस्य करार, शासकीय आयटीआय मधील प्रशिक्षणार्थीना प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि ब्लू स्टार प्रा. लि. औद्योगिक आस्थापना यांच्या दरम्यान सामंजस्य करार यासारखे महत्त्वपूर्ण करार करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सवलतीच्या व्याजदरात डायमेकर क्लस्टर साठी जे. एन. पी. ए. (JNPA) आणि युनियन बैंक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेअंतर्गत सवलतीच्या व्याजदरात निधी उपलब्ध करून देणारे निधी पत्रांचे वितरण, वाढवण पोर्ट कौशल्य विकास उपक्रमांतर्गत कस्टम डॉक्युमेंटेशन अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रांचं वितरण करण्यात आलं.