5 ते 15 वर्षे वयोगटातील आश्रमशाळेतील बालकांना अतिरीक्त डोस
पालघर : केंद्र शासनाच्या सूचनांनुसार पालघर जिल्ह्यात 15 ते 30 सप्टेंबरद रम्यान गोवर-रुबेला लसीकरणाची विशेष मोहीम राबवली जाणार आहे.
गोवर हा अत्यंत संसर्गजन्य आजार असून त्यातून अंधत्व, मेदुज्वर, श्वसन आणि कानाचे विकार उद्भवू शकतात. तर रुबेला आजारामुळे गर्भवती महिलांना गंभीर दुष्परिणाम सहन करावे लागू शकतात. या दोन्ही आजारांवर विशिष्ट औषध नसल्याने लसीकरण हाच एकमेव प्रभावी उपाय मानला जातो. त्यामुळे ही लसीकरण मोहीम राबवली जाईल.
या मोहिमेत जिल्ह्यातल्या सर्व आश्रमशाळां मधल्या 5 ते 15 वर्षे वयोगटातील बालकांना गोवर-रुबेला लसीचा एक अतिरीक्त डोस दिला जाणार आहे. यासाठी प्रत्येक आश्रमशाळेत स्वतंत्र लसीकरण सत्रांचं आयोजन केलं जाईल.आरोग्य विभागा सोबतच शिक्षण, आदिवासी विकास तसचं महिला व बालविकास विभाग या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवत आहेत.
शिक्षक, पत्रकार आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने जनजागृती मोहीम सुरू करण्यात आली आहे. बालक लसीकरणात कोणीही मागे राहू नये यासाठी पालकांशी सातत्याने संवाद साधला जात आहे.लसीकरणाचे प्रमाण 95 टक्क्यांपेक्षा अधिक नेणे, एम.आर. लसींच्या दोन डोसांमधील गळती शून्यावर आणणे, प्रत्येक बालकाचे सुरक्षित भविष्य सुनिश्चित करणे हे या मोहिमे मागचं उद्दीष्ट आहे.

















