नागरिकांच्या सुरक्षित आणि वेगवान प्रवासासाठी विकासाचा नवा दुवा
पालघर : पालघर जिल्ह्यातल्या विरार ( Virar ) पश्चिमेकडील नारिंगी परिसरातील नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणारा नारिंगी रेल्वे ओव्हर ब्रिज ( Naringi Railway Overbridge ) अखेर नागरिकांच्या सेवेत दाखल झाला आहे. वनमंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक ( Forest Minister and Guardian Minister of Palghar District, Ganesh Naik ) यांच्या हस्ते या बहुप्रतिक्षित प्रकल्पाचं लोकार्पण आज उत्साहात आणि जल्लोषात संपन्न झालं. अनेक वर्षांपासून वाहतूक कोंडी, रेल्वे फाटकावरील प्रतीक्षा आणि सुरक्षित प्रवासासाठी नागरिकांना या पुलामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.
या लोकार्पण सोहळ्यास खासदार डॉ.हेमंत सवरा, आमदार स्नेहा दुबे पंडित, राजन नाईक,आमदार राजेंद्र गावीत, वसई – विरार महापालिका महापौर अजीव पाटील, जिल्हाधिकारी डॉ .इंदु राणी जाखड, वसई-विरार शहर महानगरपालिका आयुक्त पृथ्वीराज बी. पी. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.

नारंगी रेल्वे फाटक परिसरात दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी ही स्थानिकांसाठी मोठी समस्या बनली होती. शाळा-कॉलेजला जाणारे विद्यार्थी, नोकरदार वर्ग, व्यापारी तसेच आपत्कालीन सेवांसाठी धावणाऱ्या रुग्णवाहिका यांना प्रतीक्षा करावी लागत होती. महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि रुग्णांना याचा फायदा होणार आहे. या रेल्वे ओव्हर ब्रिजमुळे आता प्रवास अधिक सुरक्षित, जलद आणि सुलभ होऊन परिसराच्या विकासाला नवी गती मिळू शकेल.
या वेळी उपस्थित मान्यवरांनी पुलाचे महत्त्व अधोरेखित करताना हा प्रकल्प केवळ पायाभूत सुविधा नसून नागरिकांच्या जीवनमानात सकारात्मक बदल घडवणारा विकासाचा भक्कम दुवा असल्याचं सांगितलं. नागरिकांच्या वेळेची बचत, अपघातांची शक्यता कमी होणे आणि वाहतुकीची सुलभता यामुळे परिसरातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला ही चालना मिळणार असल्याचं मत यावेळी व्यक्त करण्यात आलं.
















