पाणी फाउंडेशनच्या “सत्यमेव जयते फार्मर कप” उपक्रमासाठी पालघर मध्ये मेंटॉर कार्यशाळा
पालघर : शेतकऱ्यांचे संघटन मजबूत करून सामूहिक आणि शाश्वत शेतीला चालना देण्यासाठी पाणी फाउंडेशनच्या वतीनं ( Paani Foundation ) “सत्यमेव जयते फार्मर कप” ( Satyamev Jayate Farmer Cup ) उपक्रमांतर्गत पालघरच्या जिल्हा परिषद कार्यालयात ( Palghar Zilla Parishad ) मेंटॉर कार्यशाळेचं ( Mentor Workshop ) आयोजन करण्यात आलं होतं. पालघर जिल्ह्यात हा उपक्रम व्यापक स्वरूपात प्रभावीपणे राबविण्याच्या उद्देशाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.
मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे ( Chief Executive Officer Manoj Ranade ) यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झालेल्या या कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून पाणी फाउंडेशनचे डॉ. अविनाश पोळ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केलं. यावेळी त्यांनी “सत्यमेव जयते फार्मर कप” हा केवळ स्पर्धात्मक उपक्रम नसून शेतकऱ्यांना ज्ञान, संघटन आणि गटशक्तीच्या माध्यमातून सक्षम करणारी चळवळ असल्याचं सांगितलं. ज्ञानाची लालसा असणाऱ्या शेतकऱ्यांची संघटना निर्माण करणे आणि गावागावांत सक्षम मेंटॉर तयार करणे हे या उपक्रमाचं प्रमुख उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं.

ही कार्यशाळा उमेद अभियान, कृषी विभाग, आत्मा अंतर्गत कार्यरत मेंटॉर तसचं विविध विभागांतल्या मार्गदर्शकांसाठी आयोजित करण्यात आली होती. उमेद अभियानांतर्गत कार्यरत मेंटॉर, जिल्हास्तरीय अधिकारी, आत्मा अंतर्गतचे मेंटॉर, गटविकास अधिकारी, कृषी अधिकारी यांनी या उपक्रमात मेंटॉर म्हणून सक्रिय सहभाग घ्यावा आणि शेतकऱ्यांपर्यंत उपक्रम पोहोचवावा, या उद्देशाने त्यांना यामध्ये सहभागी करण्यात आलं होतं.
डॉ. पोळ यांनी उमेद अभियानाच्या कार्याचे कौतुक करताना गावागावातील सावकारी पद्धती कमी करण्यामध्ये बचत गटांनी महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचं सांगितलं. शेतकऱ्यांना परिपूर्ण ज्ञान देण्यासाठी सक्षम आणि प्रशिक्षित मेंटॉर असणे आवश्यक असल्याचं सांगत त्यांनी “हातात हात घालून काम करूया आणि शेतकऱ्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी एकत्र येऊया” असं आवाहन यावेळी करण्यात आलं. बदलत्या काळात डिजिटल शेती शाळा गावागावांत पोहोचविण्याची गरज असून ज्ञान व्यवस्थापन हे आजच्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं असल्याचं ही त्यांनी स्पष्ट केलं.
फार्मर कप उपक्रमांतर्गत सामूहिक शेती, उत्पादन खर्चात बचत, आधुनिक आणि वैज्ञानिक शेतीचा प्रसार, महिलांचे सक्षमीकरण, हवामान बदलाशी जुळवून घेणारी शेती तसचं बाजारपेठ उपलब्धता यावर विशेष भर दिला जाणार आहे. पाणी नियोजन, मृदा आरोग्य, कीड नियंत्रण आणि पीक व्यवस्थापन यांसारख्या विषयांवर शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलं जाणार आहे.
या उपक्रमांतर्गत निवासी प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार असून उत्कृष्ट काम करणाऱ्या गटांना राज्य आणि तालुका स्तरावर पुरस्कार आणि बक्षिसे दिली जाणार आहेत. सन २०१६ पासून महाराष्ट्रातील ३५० हून अधिक तालुक्यांमध्ये हा उपक्रम राबविण्यात येत असून त्याचा लाभ लाखो शेतकरी कुटुंबांना होत आहे. पालघर जिल्ह्यात ही या उपक्रमामुळे शाश्वत आणि गटशक्तीवर आधारित शेतीला चालना मिळणार असल्याचं यावेळी सांगण्यात आलं.

















