पालघर : पालघर ( Palghar ) जिल्ह्यातील १०२ रुग्णवाहिका ( 102 Ambulance ) चालकांवर लादण्यात आलेली २४ तासांची ड्युटी रद्द करावी तसेच हक्काचे वेतन आणि निश्चित कामाचे तास लागू करावेत या प्रमुख मागण्यांसाठी भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या नेतृत्वाखाली पालघर जिल्हा परिषद कार्यालयासमोर ( Palghar Zilla Parishad ) जोरदार आंदोलन ( Protest ) करण्यात आलं. जागतिक कुटुंब दिनाचं औचित्य साधत शेकडो चालक आपल्या पत्नी आणि मुलांसह या ‘घड्याळ आंदोलनात’ सहभागी झाले होते. “२४ तासांची गुलामी नको. कामाचे तास निश्चित करा. अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
यावेळी रुग्णवाहिका चालक ( Ambulance Drivers )आणि कर्मचाऱ्यांनी हातात घड्याळाचे फलक घेत प्रशासना विरोधात जोरदार निदर्शने केली. सततच्या २४ तासांच्या ड्युटीमुळे कौटुंबिक जीवनावर परिणाम होत असून मानसिक आणि शारीरिक ताण वाढत असल्याची भावना यावेळी आंदोलकांनी व्यक्त केली.
पहा व्हिडिओ :
दरम्यान, आंदोलनाच्या सुरुवातीलाच प्रशासनाने आंदोलकांना जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रांगणात प्रवेश नाकारल्याने काही काळ वातावरण तणावपूर्ण बनलं होतं. मात्र पोलिस प्रशासनाने समंजस भूमिका घेत आंदोलकांच्या भावना समजून घेतल्या आणि प्रशासनाशी समन्वय साधत आंदोलकांना प्रवेश मिळवून दिला.
आंदोलनाची तीव्रता वाढत असल्याचं लक्षात येताच आंदोलकांच्या शिष्टमंडळाला चर्चेसाठी बोलावण्यात आलं. या बैठकीत प्रशासनाने सकारात्मक भूमिका घेत २४ तासांची ड्युटी रद्द करण्याबाबत आणि इतर प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्यासाठी येत्या २६ मे रोजी विशेष संयुक्त बैठक आयोजित करण्याचं लेखी आश्वासन दिलं. प्रशासनाकडून लेखी पत्र मिळाल्यानंतर आंदोलकांनी आंदोलन तात्पुरतं स्थगित केलं असलं तरी २६ मे च्या बैठकीत ठोस निर्णय न झाल्यास अधिक तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा भूमिपुत्र एल्गार संघटनेकडून देण्यात आला आहे.
कौटुंबिक आयुष्य आणि सेवेमधील समतोल राखण्यासाठी निश्चित कामाचे तास आणि न्याय्य वेतनाची मागणी आता अधिक तीव्र झाली असून प्रशासन आगामी बैठकीत काय निर्णय घेतं याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
















