पालघर जिल्ह्याला प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण मध्ये उत्कृष्ट कामगिरीबद्दल राज्यात द्वितीय क्रमांकाचा पुरस्कार
पालघर : प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण ( Pradhan Mantri Awas Yojana-Rural) अंतर्गत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पालघर जिल्ह्याला राज्यस्तरीय पुरस्कार ( State-Level Honor ) जाहीर झाला आहे. राज्यात द्वितीय क्रमांक पटकावण्याचा मान पालघर जिल्ह्याने मिळविला आहे. हा पुरस्कार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Chief Minister Devendra Fadnavis ) यांच्या हस्ते जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रानडे ( Chief Executive Officer Manoj Ranade ) यांनी स्वीकारला.
सातारा मधल्या सैनिक स्कूल मध्ये आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्रामीण भागातील पात्र लाभार्थ्यांना हक्काचे पक्के घर उपलब्ध करून देण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रधानमंत्री आवास योजना-ग्रामीण योजने अंतर्गत पालघर जिल्ह्याने प्रभावी अंमलबजावणी, वेळेत उद्दिष्टपूर्ती, लाभार्थी केंद्रित नियोजन आणि प्रशासकीय समन्वयाच्या जोरावर उल्लेखनीय कामगिरी केली. या कामाची दखल घेत महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत “महाआवास अभियान २०२३-२४” ( Maha Awas Abhiyan 2023-24 ) अंतर्गत पालघर जिल्ह्याची राज्यातील सर्वोत्कृष्ट जिल्ह्यांमध्ये द्वितीय क्रमांकासाठी निवड करण्यात आली.
पालघर जिल्ह्यात ग्रामीण भागातील घरकुल योजनांच्या अंमलबजावणीत प्रशासनाने सातत्यपूर्ण पाठपुरावा, लाभार्थ्यांशी थेट संवाद, बांधकाम प्रक्रियेला गती आणि योजनांची प्रभावी अंमलबजावणी यावर विशेष भर दिला. त्यामुळे जिल्ह्याने राज्य पातळीवर उल्लेखनीय स्थान मिळविले आहे.
पालघर जिल्ह्याने केलेली ही कामगिरी ग्रामीण विकासाच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल मानली जात असून जिल्ह्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.

















