पालघर : पालघर जिल्ह्याच्या विकासाला नवी गती देणाऱ्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. बोईसर मधले बुलेट ट्रेन स्टेशन, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाचा आढावा घेत मुख्यमंत्री यांनी हे प्रकल्प महाराष्ट्रासह देशाच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार असल्याचा विश्वास व्यक्त केला.
पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की, बोईसर इथले बुलेट ट्रेन प्रकल्पासाठी तयार करण्यात आलेले रेल्वे स्टेशन, वाढवण बंदर, प्रस्तावित विमानतळ आणि मुंबई-वडोदरा द्रुतगती महामार्गाची पाहणी करण्यात येत आहे. यावेळी त्यांनी सांगितलं की, त्यांच्या सरकारच्या कार्यकाळात या सर्व महत्त्वाच्या प्रकल्पांना वेग मिळाला.
पहा व्हिडीओ ….
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, वाढवण बंदर हा देशासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प असून, या बंदरामुळे भारताच्या आर्थिक विकासाला मोठी चालना मिळणार आहे. यापूर्वी भारतात थेट येऊ न शकणारी मोठी मालवाहू जहाजे आता वाढवण बंदरात येऊ शकतील. त्यामुळे आंतरराष्ट्रीय व्यापार अधिक वेगाने वाढण्यास मदत होणार आहे. यासोबतच या प्रकल्पामुळे मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मिती होणार असल्याचा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

डहाणू परिसरातील डीटीपीए निर्बंधांबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, निर्बंध असलेल्या भागात ही नियोजनबद्ध पद्धतीने मोठे निवासी हब विकसित केले जातील. तसचं ज्या भागात निर्बंध नाहीत, त्या ठिकाणी विकासासाठी नवीन कॉरिडॉर उभारले जाणार आहेत. वाढवण बंदर प्रकल्पासाठी आवश्यक असलेल्या सुमारे ९० टक्के परवानग्या पूर्ण झाल्या असून, उर्वरित १० टक्के परवानग्या ही लवकरच मिळतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
राजकीय चर्चांवर भाष्य करताना मुख्यमंत्री म्हणाले की, उद्धव ठाकरे आणि आपण एकाच विमानात प्रवास केल्यामुळे सुरू झालेल्या चर्चा अनावश्यक आहेत. “कधी कधी असं वाटतं की आपण राजकीय व्यवस्थेत आहोत की वेड्यांमध्ये,” अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की, लोकांचं भलं केवळ विकासातूनच होणार असून, आपलं संपूर्ण लक्ष विकासकामांवर आहे. सर्विस फ्लाइट मध्ये कोणताही प्रवासी प्रवास करू शकतो असं ही त्यांनी स्पष्ट केलं.
















