पालघर : पालघर जिल्ह्यातल्या ( Palghar district ) मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर ( Mumbai-Ahmedabad National Highway ) महालक्ष्मी मंदिर परिसरात महामार्गाच्या मध्यभागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यामुळे ( Pothole ) वाहतूक सुरक्षेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. काँक्रीट रस्त्यातील सळया बाहेर आल्याने अवघ्या दहा ते बारा मिनिटांत १५ पेक्षा अधिक वाहनांचे अपघात झाले. अनेक वाहनांचे टायर फुटल्याने चालक आणि प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं. मागील वर्षी व्हाईट टॉपिंगसाठी तब्बल ६२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असताना ही पहिल्याच पावसात महामार्गाची झालेली दुरवस्था पाहून वाहनचालकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
गुजरातहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहिनीवर महालक्ष्मी परिसरात महामार्गाच्या मध्यभागी मोठा खड्डा पडला आहे. या खड्ड्यात काँक्रीटमधील लोखंडी सळया बाहेर आल्याने वाहनांना मोठा धोका निर्माण झाला. काल रात्री वेगात येणारी वाहने अचानक खड्ड्यात आदळल्याने अवघ्या दहा ते बारा मिनिटांत १५ हून अधिक वाहनांचे अपघात झाले.
पहा व्हिडीओ ….
या अपघातां मध्ये अनेक चारचाकी वाहनांचे टायर फुटले, तर काही वाहनांचे रिम आणि सस्पेन्शनचे ही नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याचं बोललं जात आहे. विशेष म्हणजे, मुंबई–अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाच्या व्हाईट टॉपिंगच्या कामासाठी मागील वर्षी सुमारे ६२० कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात काँक्रीट उखडून त्यातील सळया बाहेर येत असल्यानं कामाच्या दर्जाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
घटनास्थळी अडकलेल्या वाहनचालकांनी संबंधित यंत्रणेविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. इतका मोठा खर्च करून ही महामार्गाची अशी अवस्था कशी, असा सवाल उपस्थित करत दोषींवर कारवाई करण्याची आणि तातडीने खड्ड्याची दुरुस्ती करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महालक्ष्मी परिसरातील या एका खड्ड्यामुळे काही मिनिटांतच १५ पेक्षा अधिक वाहनांचे अपघात झाले. सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी हा प्रकार महामार्गाच्या गुणवत्तेवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. आता संबंधित यंत्रणा या गंभीर समस्येची किती तातडीने दखल घेते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
















