नवी मुंबई : कोकण भवन राजपत्रित अधिकारी महासंघ, वस्तू व सेवा कर अधिकारी – कर्मचारी संघटना समन्वय समिती यांच्या संयुक्त सहकार्याने घेण्यात आलेलं रक्तदान शिबीर राज्यात अनुकरणीय ठरेल असा विश्वास वस्तू व सेवा कर ठाणे झोनचे अतिरीक्त आयुक्त सुमेरकुमार काळे यांनी व्यक्त केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सूचनेनुसार 23 डिसेंबरला कोकण भवन येथे रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते.
विशेष म्हणजे कार्यक्रमासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांनी सर्वप्रथम रक्तदान करून या शिबिराला सुरुवात केली. कोकण भवन आणि आसपासच्या परिसरातल्या अधिकारी, कर्मचारी तसेच नागरीकांनी मोठया संख्येने रक्तदान करून या समाजकार्यात कर्तव्य भावनेने आपला सहभाग नोंदविला.
कोरोना महामारी सोबत संपूर्ण जग लढत आहे. करोना व्हायरस विरुद्ध असलेले हे युद्ध जिंकण्यासाठी सर्व यंत्रणा विविध पद्धतीने प्रयत्न करत आहेत. या लढाईत कोकण विभागातील शासकीय कर्मचारी हे नेहमीच पुढे असतात. हे या शिबीराच्या आयोजनातून दिसून आले. या रक्तदान शिबीरात आयोजकांनी सोशल डिस्टन्सिंगसह मास्क आणि सॅनिटाईझरचा योग्य वापर केला.
हे शिबीर यशस्वी करण्यासाठी राज्यकर सहआयुक्त (वस्तू व सेवा कर) प्रदिप कडू, उपायुक्त (वस्तू व सेवाकर) कमलेश नागरे, उपायुक्त डॉ.नागरगोजे, उपसंचालक (महिती) कोकण विभाग डॉ. गणेश मुळे, सहाय्यक संचालक (आरोग्य) बी. एस. सोनावणे, वैद्यकीय अधिकारी (कोकण भवन) डॉ.गणेश धुमाळ, वैद्यकीय अधिकारी (डी.वाय.पाटील हॉस्पिटल) डॉ.सीमा गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले. डी.वाय.पाटील हॉस्पिटलच्या रक्तपेढीने या उपक्रमास उस्त्फुर्त प्रतिसाद दिला. यावेळी डी.वाय.पाटील हॉस्पिटल रक्त संक्रमण अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. राज्य कर अधिकारी, अश्विनी चौधरी (कोकण विभाग महिला अध्यक्षा) यांनी शिबीराच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन केलं.