धुळे / नितीन जाधव : धुळे जिल्ह्यातला शिरपूर तालुका दोन वेगवेगळ्या खुनांच्या घटनांनी अक्षरशः हादरून गेला आहे. एकीकडे शिरपूर तालुक्याल्या अंतुरली गावात एका चिमुकल्याला दगडाने ठेचून मारण्यात आल्याची घटना तर दुसरीकडे याचं शिरपूर तालुक्यातील सुलवाडे धरणाजवळ एका अनोळखी महिलेचे प्रेत गोणीत भरून दगड बांधून नदीत फेकल्याची घटना समोर आली आहे.
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्या मधल्या नवी अंतुर्ली शिवारात एका अज्ञाताने सहा वर्षीय चिमुकल्याची दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुधवारी रात्री ही घटना उघडकीस आली. मोहित दिनेश ईशी याचा भरदुपारी हा खून झाला असावा असे बोलले जात आहे. या घटनेची माहिती मिळताच तालुका आणि जिल्ह्यातील तपास यंत्रणा रात्री उशिरापर्यंत घटनास्थळी दाखल झाल्या. नवी अंतुर्ली येथील दिनेश शिवाजी आणि ज्योती दिनेश ईशी यांचा तो मुलगा होता. मोहित हा गावातील एका शेतात मजुरीसाठी गेलेल्या आई सोबत गेला होता. दुपारी खेळत असताना अचानक मोहित गायब असल्याचे आई ज्योती हिच्या लक्षात येताच शोधाशोध सुरू झाली. परंतु तो सापडला नाही. शोध घेत असतांना सायंकाळी मात्र तो उशिरा एका शेतात मृतावस्थेत आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, पीएसआय सोनवणे, पोहेकॉ गुलाब ठाकरे, पोलीस नाईक अनिल शिरसाट, ललित पाटील, दिनेश माळी, रवींद्र ईशी, सनी सरदार, बापूजी पाटील, अमित जाधव, उमेश पाटील, स्वप्नील बांगर आदींनी घटनास्थळी पोहचून पाहणी केली. आणि घटनेचे गांभीर्य पाहता घटनास्थळी फॉरेन्सिक पथक, स्वान पथक, सायबर क्राईम, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आदींचे अधिकारी आणि कर्मचारी यांच्या टीमना बोलवण्यात आले.
तर दूसरीकडे याचं शिरपूर तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदीच्या पात्रात एका अनोळखी महिलेचा मृतदेह गोणीत भरुन फेकलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. या महिलेला डोक्यावर वार करुन मारण्यात आल्याचं पोलिस तपासात समोर आलं असून या प्रकरणी शिरपूर शहर पोलिस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 22 डिसेंबर ला दुपारी ३ वाजेच्या सुमारास शिरपूर तालुक्यातील उपरपिंड शिवारात तापी नदीच्या पात्रावरील सुलवाडे बॅरेज गेट क्र. २५ जवळ एका गोणपाटात ३० ते ३५ वर्षे वयोगटातील अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला. त्या महिलेला मारुन तिचे प्रेत पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गोणीत भरुन ती गोणी दोरीच्या सहाय्याने दगडाला बांधून तापी नदीच्या पात्रात फेकून देण्यात आले होते. मात्र ते प्रेत काही लोकांना आढळून आले. शिरपूर शहर पोलिसांना घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी अनिल माने, पोलीस निरीक्षक हेमंत पाटील, उपनिरीक्षक किरण बार्हे यांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.
अज्ञात मारेकर्याने त्या महिलेच्या डोक्यात वार करुन तिचा खून केला आणि नंतर तिचा मृतदेह फेकला गेल्याचे पोलीस तपासात स्पष्ट झाले. पंचनामा करुन मृतदेह शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. शवविच्छेदनाचा अहवाल शिरपूर शहर पोलिस ठाण्यात पोलिस हे.कॉ. गोपाल नानसिंग सत्तेसा यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन अज्ञात आरोपी विरुध्द भादवि कलम ३०२, २०१ नुसार खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मयत महिलेची ओळख पटवण्यासह मारेकर्याचा शोध घेण्याचे काम पोलिसांनी सुरु केले आहे.
या दोन्ही प्रकरणाचा पुढील तपास शिरपूर शहर पोलीस करीत आहेत.