पालघर / नीता चौरे : मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हारचं नाव ऐकलं की समोर येत ते इथल्या आदिवासीबहुल भागातलं कुपोषण, बेरोजगारी आणि निरक्षरता. मात्र आता मिनी महाबळेश्वर हे नाव सत्यात उतरवण्यासाठी जव्हार मोखाड्यातल्या शेतकरी पुढे सरसावले आहेत. पारंपरिक भात शेती आणि नाचणी शेतीला बगल देत इथल्या शेतकऱ्यांकडून सध्या स्ट्रॉबेरीची लागवड केली जातेय. आणि यातून इथल्या शेतकऱ्यांना उत्तम उत्पन्न देखील मिळत आहे.
मिनी महाबळेश्वर अशी ओळख असलेल्या जव्हार मध्ये कृषी विभागाच्या सहाय्यानं सध्या शेतकरी स्ट्रॉबेरी लागवडीकडे वळताना दिसून येतात. खरंतर जव्हार आणि मोखाडा हा आदिवासी बहुल भाग. या भागात पावसाळ्यात भातशेती आणि नाचणी ची शेती केली जाते. मात्र या शेतीनंतर इथले अनेक नागरिक हे रोजगारासाठी आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होतात. स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध नसल्यानं स्थलांतरण मोठ्या प्रमाणात होत असल्यानं या भागात वर्षानुवर्ष कुपोषण, बेरोजगारी असे प्रश्न भेडसावत आहेत. मात्र यालाच बगल देत आता इथल्या शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरी लागवडीचा यशस्वी प्रयोग केला आहे. प्रायोगिक तत्त्वावर जव्हार आणि मोखाडा या दोन तालुक्यातल्या जवळपास 86 शेतकऱ्यांनी स्ट्रॉबेरीची लागवड केली असून यातून त्यांना बऱ्यापैकी नफा मिळत आहे.
जव्हार आणि मोखाडा इथलं स्थलांतरण, बेरोजगारी, कुपोषण रोखण्यासाठी शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या गेल्या. मात्र स्थानिक पातळीवर रोजगार देण्यास शासन अपयशी ठरत असल्याचं वारंवार समोर आलं. त्यामुळे आता आपल्याच शेतात या शेतकऱ्यांना रोजगार मिळणार असून यातून त्यांना माफक असा नफा ही मिळेल. जव्हार आणि मोखाडा तालुक्यातल्या 86 शेतकऱ्यांनी जवळपास 11 एकरा वरती स्ट्रॉबेरीची लागवड केली असून यातून त्यांना चांगलं उत्पन्नही आलं. शिवाय या स्ट्रॉबेरी वर कुठलाही रोग अजून पर्यंत निदर्शनास आला नसल्यानं पुढील वर्षापासून या प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेला लागवडीचं रूपांतरण व्यवसायिक शेतीमध्ये करण्याचा मानस कृषी विभागाचा आहे. कृषी विभागाकडून या वर्षी प्रत्येकी शेतकऱ्याला प्रायोगिक तत्वावर 600 स्ट्रॉबेरीच्या रोपांच वाटप करण्यात आलं होतं. या लागवडी आधी या शेतकऱ्यांना स्ट्रॉबेरी लागवडीचं प्रात्यक्षिक प्रशिक्षणही देण्यात आलं होतं.
प्रायोगिक तत्त्वावर केली गेलेली ही शेती यशस्वी ठरल्यानं पारंपारिक शेतीला बगल देत जव्हार आणि मोखाडा या दुर्गम भागातला शेतकरी सध्या पर्यायी पिकांकडे वळताना पाहायला मिळत आहे. याचा फायदा इथलं स्थलांतरण, बेरोजगारी, कुपोषण या सारख्या समस्यांवर मात करण्यासाठी होऊ शकतो.