पालघर : पालघर जिल्ह्यात 4 ते 8 जुलै दरम्यान मुसळधार पावसाची शक्यता हवामान भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून एनडीआरएफची एक टीम पालघर जिल्ह्यात दाखल झाली आहे.पालघर जिल्ह्यातल्या मनोर मध्ये ही एनडीआरएफची टीम पोचली असून जिल्हा आपती व्यवस्थापन त्यांच्या संपर्कात आहे. या टीम मध्ये 20 जवान, 2 अधिकारी आणि 8 बोटिंचा समावेश आहे. जिल्ह्यात पूर स्थिती निर्माण झाल्यास आपण सज्ज असल्याचं यावेळी एनडीआरएफ कडून सांगण्यात आलं.
गेल्या दोन दिवसांपासून पालघर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु होता. आज पावसाचा जोर कमी असून अधून मधून मध्यम स्वरूपाचा पाऊस सध्या जिल्ह्यातल्या अनेक भागांत बरसत आहे. गेल्या काही दिवसांत झालेल्या या पावसामुळे पालघर जिल्ह्यातला साखरे डॅम हा ओव्हर फ्लो झाला आहे.
तसचं या पावसामुळे जिल्ह्यात विविध ठिकाणी जवळपास 8 घराचं तुटून नुकसान झालं आहे. तर एक पाण्यात वाहून गेल्याची घटना देखील घडली आहे. जिल्ह्यात जास्त पाऊस हा पालघर आणि वसई तालुक्यात झाला. आज मिळालेल्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण पाऊस हा 626.45 मि.मी इतका झाला असून एकुण सरासरी पाऊस हा 78.30 मि.मी इतका झाला आहे.