पालघर : पालघर जिल्ह्यातल्या तलासरी तालुक्या मधल्या डहाणू आदिवासी विकास प्रकल्पा अंतर्गत येणाऱ्या झाई शासकीय आश्रमशाळेतल्या (Zai Asharm School ) नऊ वर्षीय सारिका भरत निमला ( Sarika Nimala ) या इयत्ता चौथी मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थिनीच्या शनिवारी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. या विद्यार्थीनीचे शव हे शवविच्छेदनासाठी मुंबईतल्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये मध्ये पाठवण्यात आले होते. शवविच्छेदनाच्या अहवालात या मुलीच्या फुफ्फुसांमध्ये संसर्ग ( Lungs Infection ) झाला असल्याची माहिती समोर आली आहे. असं डहाणूच्या उपविभागीय दंडाधिकारी तथा डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितलं.
मिळालेल्या माहितीनुसार, या विद्यार्थिनीला डोकेदुखी होत असल्यानं तिला देहरी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. तिथे तिची तपासणी करून तिला औषधं देण्यात आली. त्यानंतर शनिवारी सकाळी सारिका ही विद्यार्थीनी अचानक बेशुद्ध पडली. त्यामुळे तिला घोलवडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आलं. मात्र तिची प्रकृती गंभीर असल्यानं तिला डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आलं. मात्र तो पर्यंत तिचा मृत्यू झाला होता. सकाळी 9 वाजताच्या दरम्यान तिथल्या डॉक्टरांनी तिला तपासून मृत घोषित केलं. त्यांनतर त्या विद्यार्थीनीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी मुंबईतल्या जे.जे. हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात आला. शवविच्छेदनाच्या अहवालात या विद्यार्थिनीला lungs infection झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे.
इतर 11 विद्यार्थी उपचारासाठी डहाणू उपजिल्हा रुग्णालयात दाखल :
या घटनेनंतर झाई आश्रम शाळेत वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप भारती आपल्या पथकासह जाऊन सर्व विद्यार्थ्यांची तपासणी केली. त्यानंतर अर्णव हरपाले (6 वर्षे ), प्रितिका दादोडा ( 10 वर्षे ), रितिका थापड ( 10 वर्षे ), कविता घुलावे ( 11 वर्षे ), आर्या बोबा ( 5 वर्षे ), महेश उराडे ( 11 वर्षे ), सूर्य चितमड्या ( 5 वर्षे ), अतु बीरडे ( 5 वर्षे ), अनुसया नाग्रो ( 10 वर्षे ), बर्फी खरपडे ( 9 वर्षे ), पायल करबट ( 9 वर्षे ) अशा 8 मुलींना आणि 3 मुलांना एकूण 11 विद्यार्थ्यांना उपचारासाठी डहाणूच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. या विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या चाचण्या करण्यात आल्या असून सध्या सर्व विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर आहे. या विद्यार्थ्यांच्या रक्ताच्या चाचण्यांचे रिपोर्ट आल्यानंतर नेमकं कारण कळू शकेल. प्राथमिक अंदाजानुसार व्हायरल तापामुळे मुलांना हा त्रास झाला आल्याची शक्यता वर्तवली जात आहे. अशी माहिती डहाणूच्या उपविभागीय दंडाधिकारी तथा डहाणू आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी आशिमा मित्तल यांनी दिली आहे.