पालघर : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पालघर जिल्हा परिषद कार्यालयात जिल्ह्यातल्या प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कार प्रदान करून मोठ्या उत्साहात कृषी दिन साजरा करण्यात आला. यावेळी महाराष्ट्र शासनाचा कृषी पुरस्कार प्राप्त असलेल्या ६ प्रयोगशील शेतकऱ्यांना पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा वैदेही वाढाण यांच्या हस्ते पुरस्कार देवून गौरविण्यात आलं. तसचं बिरसा मुंडा कृषी क्रांतिकारी योजने अंतर्गत ही ३६ पुरस्कार देण्यात आले. यावेळी कृषी दिनानिमित्त विशेष घटक योजनेच्या ८ कृषी अधिकाऱ्यांना देखील सन्मानित करण्यात आलं.
पालघर मध्ये स्ट्रॉबेरी, चिकू, मोगरा तसचं अनेक वेगवेगळ्या प्रयोगातून वेगळी ओळख निर्माण होऊ शकते असं मत व्यक्त करत तरुणांनी जास्तीत जास्त शेतीत उतरून आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करावा असं आवाहन यावेळी वैदेही वाढाण यांनी तरुणांना केलं. या कार्यक्रमाला मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर सांबरे, कृषी व पशुसंवर्धन समिती सभापती प्रतिभा गुरोडा, समाज कल्याण समिती सभापती रामू पागी, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम, सारिका निकम, नीता पाटील, राजेश मुकणे, शैलेश करमोडा, कृष्णा माळी, गणेश कासट, मंगेश भोईर, शेलु कुऱ्हाडा, करिष्मा उमतोल, रघुनाथ माळी, प्रकल्प संचालक तुषार माळी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा) संघरत्ना खिल्लारे, जिल्हा कृषी अधीक्षक दिलीप नेरकर आदी उपस्थित होते.
पालघर जिल्ह्यातल्या कोसबाडच्या कृषि विज्ञान केंद्रात देखील कृषि दिनानिमित्त कृषि विभाग, पंचायत समिती आणि तालुका कृषि विभाग डहाणू यांच्या संयुक्त विद्यमानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बिरसा मुंडा योजनेंतर्गत विहीर घेणाऱ्या लाभार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसचं पोषण बाग उपक्रमांच्या लाभार्थ्यांना भाजीपाला बियाणांचं वितरण करण्यात आलं. प्रक्षेत्र भेटीमध्ये भात लागवडीच्या विविध पद्धतींची आणि ट्रे भात रोपवाटिका याबाबतची माहिती शास्त्रज्ञ भरत कुशारे आणि प्रशांत वरठा यांनी यावेळी उपस्थित शेतक-यांना दिली.
कार्यक्रमाचं सूत्रसंचालन रूपाली देशमुख यांनी केलं. तर आभार प्रदर्शन अनुजा दिवटे यांनी केलं. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी अनिलकुमार सिंग, अशोक भोईर, प्रसाद कासले, नागेश संखे यांनी विशेष मेहनत घेतली.