पालघर : पालघर जिल्ह्यातल्या बोईसर – तारापूर औद्योगिक क्षेत्रातल्या ( एमआयडीसी ) प्रीमियर इंटरमिडीएटस या केमिकल कंपनीत मंगळवारी रात्री साडे बारा वाजताच्या सुमारास स्फोट होऊन भीषण आग लागली होती. या लागलेल्या आगी दरम्यान कंपनीत अनेक स्फोट झाल्यानंतर आग भीषण झाली. आगी दरम्यान अनेक मोठंमोठे स्फोट झाले. हे स्फोट इतके मोठे होते की त्यांच्या आवाजाने आसपासचा बराचसा परिसर हादरला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन आणि अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. आठ तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाच्या जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. या आगीत कोणत्याही प्रकारच्या जीवितहानीचं वृत्त नाही. मात्र ही आग इतकी भीषण होती की संपूर्ण कंपनी जळून खाक झाली आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.