पालघर : प्रत्येक जीवनासाठी पाणी हा महत्त्वाचा नैसर्गिक स्त्रोत आहे. या पाण्याचं महत्त्व अधोरेखीत करुन त्याची सर्वकाळ उपलब्धता, सुरक्षितता आणि शाश्वत वापरासाठी व्यापक प्रमाणावर जनजागृती करण्यासाठी जागतिक जल दिनाचं औचित्य साधुन जिल्ह्यात 22 ते 27 मार्च दरम्यान जनजागृती सप्ताह आयोजन करण्यात आलं आहे. जागतिक जल दिनानिमित्त पालघर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या उपस्थितीत पालघर जिल्हा परिषदेच्या सर्व विभाग प्रमुखांनी आणि कर्मच्या-यांनी पाणी बचतीबाबत जल शपथ घेतली.
दरवर्षी 22 मार्च हा दिवस सर्वत्र जागतिक जलदिन म्हणून साजरा करण्यात येतो. ग्रामीण जनतेला शुद्ध, पुरेसं आणि शाश्वत पाणी उपलब्ध होण्यासाठी जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता मिशन कक्ष आणि ग्रामीण पाणी पुरवठा विभाग यांच्या संयुक्त विद्यमानं पाणी शुद्धता, पाणी वाचवा, पाणी सुरक्षितता आदीबाबत विविध उपक्रम जिल्ह्यातल्या सर्व तालुक्यांत गट विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामपंचायत स्तरावर 22 ते 27 मार्च या एका आठवड्या दरम्यान आयोजित करण्यात येणार आहेत आहेत.
आज जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर जलप्रतिज्ञा घेऊन जल जनजागृती सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. या एका सप्ताहांत जुनं ते सोनं, जल स्त्रोतांचं पुनरुज्जीवन, बळकटीकरण स्पर्धा, स्त्रोत आणि साठवण टाकी जलकुंभ साफसफाई सप्ताह, शुन्य गळती मोहीम, जल जीवन मिशन लोगो स्पर्धा, पाण्यावरील लोक गीतं, पोस्टर, रांगोळी स्पर्धा, जलसाक्षरता या विषयावर नाटिका, निबंध स्पर्धा, चित्रकला स्पर्धा अशा उपक्रमासह ग्रामपंचायत- शाळा-अंगणवाडी स्तरावर शुद्ध पाण्याचं महत्त्व समजावून सांगणे, सप्ताहाची व्यापकता पटवून देणे, पाणी जपून वापरण्याची आवश्यकता आणि पद्धती डिजीटल माध्यमांचा वापर करुन समजावून सांगणे, पिण्याचं पाणी तपासणीमध्ये दुषित आलेल्या स्त्रोतांच्या उपाययोजना आणि दुरुस्तीबाबत माहिती देणे, पाणी शुद्धीकरण कार्यपद्धती, टीसीएल वापर, सार्वजनिक पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत आणि साठवण टाकीची स्वच्छता करणे, नादुरुस्त स्त्रोत दुरुस्त करणे आदी उपक्रम राबवले जाणार आहेत.