पालघर : जव्हार , पालघर नंतर आता मोखाडा तालुक्यातल्या कारेगाव इथल्या जव्हार प्रकल्पाच्या आदिवासी आश्रम शाळेतल्या 13 विद्यार्थ्यांना आणि आणि एका कर्मचारी महिलेला कोरोनाची लागण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आश्रमशाळेत शिकणारे दोन विद्यार्थी हे जवळच्या लग्न सोहळ्यात गेले होते. आणि त्यानंतर त्यांच्यामध्ये कोरोनची काही लक्षण दिसून येत असल्यानं त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानं आश्रम शाळेतल्या 103 विद्यार्थ्यांच्या चाचण्या करण्यात त्यात 13 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जव्हार च्या कोविड केअर सेंटर मध्ये दाखल करण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यातल्या जव्हार तालुक्या मधल्या हिरडपाडा इथल्या अनुदानित आश्रमशाळेतल्या 37 विद्यार्थ्यांना आणि 2 शिक्षकांना, एक शिपाईला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर पालघर तालुक्यातल्या नंडोरे आदिवासी आश्रमशाळेतल्या 30 विद्यार्थ्यांना आणि एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली होती. तर जव्हार आश्रम शाळेतल्या एका अधिक्षकाचा नुकताच कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
त्यामुळे पालघर जिल्ह्यातल्या अनेक आश्रम शाळांमध्ये आता कोरोनाचा शिरकाव होत असल्याचं चित्र दिसून येत आहे. हे थांबवण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून लवकरात लवकर कडक पाऊलं उचलणं गरजेचं आहे.
जिल्ह्यात कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव पुन्हा वाढत असल्यानं दिवसेंदिवस रुग्ण संख्येत वाढ होत आहे. पालघर आणि जव्हार तालुक्यातल्या आश्रमशाळेतल्या विद्यार्थ्याना कोरोनाची लागण होत असल्याची बाब विचारात घेता जिल्ह्यातल्या सर्व शासकीय आणि अनुदानित निवासी आश्रमशाळा तसचं इतर शासकीय विभागांची वसतीगृहे आणि खासगी वसतीगृहे ही 22 मार्च ते पुढील आदेश येईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालघर चे जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांनी आज दिले आहेत. यात दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना मात्र वसती गृहात राहणं एच्छिक असणार आहे.