मुंबई : रस्त्यावरील अपघातात, खेळताना, मारामारीत डोक्याला जखम होऊन मेंदूला मार लागण्याची शक्यता असते. याला ‘हेड इंज्युरी’ असे म्हणतात. डोक्याला दुखापत झाल्यास अनेकदा रूग्णाचा मृत्यू किंवा अपंगत्व येण्याची शक्यता अधिक असते. तुम्हाला माहिती आहे का? बऱ्याचदा डोक्याला बसणारा फटका हा सौम्य किंवा गंभीर स्वरूपाचा असू शकतो. परंतु, एखाद्या अपघातात मेंदूला इजा पोहोचल्यास अंतर्गत रक्तस्त्राव होऊ शकतो. कवटीची हाडे फ्रॅक्चर होऊ शकतात. या व्यतिरिक्त एपिड्युरल हेमेटोमा आणि सबड्युरल हेमेटोमा म्हणजे कवटीच्या आवरणाखाली रक्ताच्या गुठळ्या तयार होतात. या समस्यांकडे दुर्लक्ष न करता वेळीच लक्ष देणे आवश्यक आहे.
लक्षणे :
डोक्याला झालेल्या दुखापतीची तीव्रता प्रत्येक व्यक्तीनुसार वेगवेगळी असते. डोक्याला मार लागलेल्या व्यक्तींमध्ये साधारणपणे ही लक्षणे दिसून येतात. जसं, डोकेदुखी, फोटोफोबिया (प्रकाश संवेदनशीलता), चक्कर येणं, मळमळणे, वारंवार उलट्या होणे, थकवा जाणवणे, झोपेच्या पद्धतीत बदल होणे, अस्पष्ट दृष्टी, शुद्ध हरपणे. याव्यतिरिक्त डोक्याची दुखापत गंभीर स्वरूपाची असल्यास रूग्णाला बोलताना अडचणी येणं, बेशुद्धपणा, चालता न येणं, अशक्तपणा जाणवणे, कोमात जाणे, कानातून द्रव बाहेर येणं, अशी लक्षणं दिसून येतात.
निदान आणि उपचार :
बऱ्याचदा अनेक लोक डोक्याला किरकोळ इजा झालेली आहे, असे मानून वैदयकीय तपासणी करून घेत नाही. परंतु, डोक्याला मार लागल्यावर डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार एक्स-रे, सीटी-स्कॅन किंवा एमआरआय करून घेणं गरजेचं आहे. यावरून डोक्याला किती खोलवर दुखापत झाली आहे, याचे अचूक निदान होते. या चाचणी अहवालातून रूग्णाला नेमकं काय उपचार द्यायचे हे डॉक्टर ठरवतात. अनेक प्रकरणांमध्ये जखम झालेल्या जागी टाके मारले जातात. तर काहींना दुखापत झालेल्या भागावर बर्फ लावला जातो. परंतु मेंदूला लागल्याने आत रक्तस्त्राव झाला असेल तर शस्त्रक्रिया करावी लागते.
डोक्याचे संरक्षण करण्यासाठी काय करावं :
बाईकवरून प्रवास करताना निमयितपणे हेल्मेट परिधान करा, लहान मुलं कोणत्या मैदानात खेळत आहेत, याची माहिती पालकांनी करून घेणं गरजेचं आहे, अशक्तपणा जाणवत असल्यास खेळणं टाळावेत, खराब रस्त्यावर सायकल चालविणे किंवा स्केटिंग करणे टाळा, पूल, पार्क किंवा समुद्रकिनाऱ्यावर आखून दिलेल्या मार्गदर्शकतत्त्वांचे पालन करा. याकडे दुर्लक्ष करणे हानीकरण ठरू शकते, गाडी चालवताना सीट बेल्टचा वापर करा, मदयपान करून गाडी चालवू नका, यामुळे अपघात होऊ शकतो आणि डोक्याला दुखापत होण्याची शक्यता अस शकते, घरात असणाऱ्या पायऱ्या नेहमी स्वच्छ ठेवा, घरातील खिडक्यांना ग्रील बसवून घ्या, जेणेकरून तेथून कोणी खाली पडणार नाही.
दरवर्षी 20 मार्च हां दिवस ‘हेड इंज्युरी’ दिन म्हणून साजरा केला जातो. आणि याचं हेड इंज्यूरी दिनानिमित्त आपल्या डोक्याला इजा होवू नये म्हणुन काय करावं आणि काय करून नये याबाबतची ही सविस्तर माहिती मुंबईच्या ग्लोबल रूग्णालयातले क्रिटिकल केअर युनिट विभागप्रमुख डॉ. प्रशांत बोराडे यांनी दिली आहे.