पालघर : सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळी आणि इनोव्ह इंटलेक्ट, दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमानं पालघरच्या सोनोपंत दांडेकर महाविद्यालयात बौध्दिक संपदा हक्क Intellectual Property Rights (IPR) हा अभ्यासक्रम सुरू करण्यासंदर्भात सामंजस्य करार करण्यात आला आहे.
विज्ञान विषयातल्या पदवीधर तसचं पदव्युत्तर विद्यार्थ्यांना हा अभ्यासक्रम करता येणार आहे. हा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या क्षेत्रात नवनवीन नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. हा कोर्स केल्यानंतर विद्यार्थी भारत सरकारची पेटंट एजंट परीक्षा देऊन स्वतःचा स्वव्यवसाय ही सुरू करू शकतात. त्यामुळे बौध्दिक संपदा हक्क हे एक अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे असं प्रतिपादन सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे अध्यक्ष अॅड. जी. डी. तिवारी यांनी केलं.
सोनोपंत दांडेकर महाविद्यालय गेल्या काही वर्षापासून विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच नोकरी व्यवसाय करण्यासाठी उपयोगी पडतील असे शॉर्टटर्म कोर्सेस उपलब्ध करुन देत आहेत. हा अभ्यासक्रम सुध्दा विद्यार्थ्यांच्या दृष्टीनं अत्यंत उपयुक्त असून तो करण्यासाठी मुंबईला जाण्याचा विद्यार्थ्यांचा खर्च आणि वेळ दोन्ही वाचेल असं प्रतिपादन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. किरण सावे यांनी यावेळी केलं. हा अभ्यासक्रम महाविद्यालयात सुरू व्हावा यासाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. सुहास जनवाडकर यांनी प्रयत्न केलेत.
नियमित विद्यार्थ्याबरोबरच हा अभ्यासक्रम बोईसर मधल्या तारापूर एम.आय.डी.सी. मध्ये आणि इतरत्र विविध उद्योगात काम करणाऱ्या अनुभवी कर्मचाऱ्यांसाठी अर्धवेळ स्वरुपात देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाच्या अधिक माहितीसाठी डॉ. वैभवा मोरे (8788094874) आणि प्रा. सिध्दी पाटील (9370675530) यांच्याशी संपर्क साधाण्याचं आवाहन महाविद्यालय प्रशासनाने केलं आहे.