बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात आज देखील अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली असून जिल्ह्यातल्या 13 तालुक्यात अवकाळी पाऊस कोसळला. सकाळी सहा वाजता पासून ते दुपारी बारा वाजेपर्यंत हा पाऊस सुरू होता. आणि पुन्हा सायंकाळी चार वाजताच्या नंतरही या पावसाने अधिकवेळ बरसून सर्व ठिकाणी धुमाकूळ घातला.
गेल्या चार दिवसांत ७ हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालं असून जवळपास 10 हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसलाय. अवकाळी झालेल्या या गारपिटीमुळे कांदा, मका, गहू, केळी, पेरू, आंबा, भाजीपाला फळपिके, भुईमूग, ज्वारी, केळी, पपई, टरबूज, हरभरा, मूग या पिकांचं नुकसान झालं आहे. तर गारपीट आणि पावसामुळे आंब्याचा मोहर देखील गळून पडला असून काही ठिकाणी कोयीने जाळे पकडलेल्या आंब्याला मोठा फटका बसला आहे. गारपीट तसचं या अवकाळी पावसामुळे 209 गावं बाधित झाली आहेत.
जिल्ह्यात 18 मार्चपासून अवकाळी पावसानं हजेरी लावली. या पावसाने कृषी क्षेत्राला तडाखा दिला असून जिल्ह्यातील नऊ तालुक्यां मधल्या 9 हजार 837 शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. यामध्ये प्रामुख्याने बुलडाणा, चिखली, मलकापूर, मोताळा, खामगाव, नांदुरा, मेहकर, देऊळगाव राजा, सिंदखेड राजा या तालुक्यांना मोठा फटका बसला आहे.
18 ते 19 मार्च दरम्यान या तालुक्यातील 2 हजार 812 हेक्टवरील पिकांचे नुकसान झाले होत. जवळपास 100 गावांतले 4 हजार 433 शेतकरी त्यामुळे प्रभावित झाले आहेत. यात प्रामुख्याने एकट्या मेहकर तालुक्यात 2 हजार हेक्टरवर नुकसान झाले होत. त्यानंतर 20 आणि 21 मार्च ला झालेल्या अवकाळी पावसामुळे 4 हजार 122 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे. यात 5 हजार 404 शेतकऱ्यांचे नुकसान झालं. खामगाव तालुक्याला ही अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला. 109 गावांत या अवकाळी पावसाने कहर केला आहे. 18 ते 21 मार्च दरम्यान झालेल्या एकंदरीत नुकसानाचा विचार करता 9 हजार 837 शेतकऱ्यांचे 7 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या कृषी विभागाचे कर्मचारी, महसूल विभागाचे कर्मचारी, तलाठी, मंडळ अधिकारी हे गावपातळीवर जाऊन झालेल्या नुकसानीचा एकंदरीत अंदाज घेत आहेत. दरम्यान गेल्या खरीप हंगामातही तब्बल 74 हजार हेक्टरवर अतिवृष्टीमुळे म्हणा किंवा जादा पावसामुळे म्हणा जिल्ह्यात नुकसान झालं होतं. त्यानंतर आता उन्हाळ्यात हा फटका पावसाने दिला आहे.